Video :मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना खासदारांचीच नाराजी!

राम चौधरी
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

वाशीम : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी (ता.30) पार पडला. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वाशीम : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी (ता.30) पार पडला. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार रविवार (ता.30) पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारात संजय राठोड यांची पुन्हा कॅबीनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. संजय राठोड युतीच्या मंत्रीमंडळातही मंत्री होते. ते वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. तेंव्हापासूनच खासदार भावना गवळी व संजय राठोड यांच्यात पक्षांतर्गत शितयुद्ध शिगेला पोचले होते. तसेच जिल्ह्यामध्ये शिवसेनेत दोन गट उघडपणे कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटांनी तात्पुरता युद्धविराम केला होता. मात्र, आता संजय राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे खासदार भावना गवळी यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

 

यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, या मंत्रीमंडळ विस्तारात पश्‍चिम विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघाचे संजय रायमुलकर किंवा अकोला येथून विधान परिषदेचे गोपीकिशन बाजोरीया यांचे नाव यायला पाहिजे होते. तशा प्रकारचे लेखी निवेदन खासदार प्रतापराव जाधव, खासदार भावना गवळी, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, गोपीकिशन बाजोरीया, सगळे जिल्हा प्रमुख, माजी आमदार यांसह आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. तरीही हे पद दुसरीकडे गेल्याने आमची निश्‍चितच नाराजी आहे. अशी उघड भूमिका खासदार भावना गवळी यांनी घेतली. मंत्रीमंडळात बुलडाणा किंवा अकोला या जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे, अशी आमची मागणी होती. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - महाबीजची आमसभा गाजली वेगळ्याच विषयावर

Image may contain: 4 people, people smiling, beard and text

मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश झाल्याने तुमची नाराजी आहे काय? 
यावर खासदार भावना गवळी यांनी आमची निश्‍चितच नाराजी असल्याचे सांगितल्याने खासदार भावना गवळी यांचा रोष संजय राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशावर असल्याचे उघड झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या मंत्रीमंडळावर शिवसेनेच्याच खासदार भावना गवळी यांनी नाराजी व्यक्त केल्याने, शिवसेनेतील राठोड विरुद्ध गवळी हे शितयुद्ध जगजाहीर झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Wasim Buldana Shivsena MPs over angry with cabinet expansion