अकोल्याचा गोलंदाज ठरतोय फलंदाजांसाठी कर्दनकाळ

भगवान वानखेडे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा गाजवतोय अकोलेकर 
- दर्शन नळकांडेचे मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांत सर्वाधिक १४ बळी
- कोण आहे दर्शन नळकांडे?

अकोला: बीसीसीआयतर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अकोल्यातील क्रिकेटपटू दर्शन नळकांडे हा गोलंदाज फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो आहे. विदर्भ संघाकडून स्पर्धेत आतापर्यंत पाच सामन्यांत दर्शनने सर्वाधिक १४ बळी घेतले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेत गडी बाद करण्याच्या सरासरीत सध्या तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या या कामगिरीमुळे अकोला क्रिकेट क्लबच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

मुश्ताक अली स्पर्धेमध्ये भारतातील सर्व राज्यांचे व केंद्रीत प्रदेशातील संघ सहभागी होतात. ही स्पर्धा ८ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत दर्शन नळकांडे हा विदर्भ संघाकडून खेळत आहे. त्याने पहिल्या सामन्यापासूनच गोलंदाजीची चुणूक दाखविली आहे. स्पर्धेत ८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरा विरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात दर्शनने भेदक मारा करत २५ धावा देऊन तीन बळी घेतले होते.

Image may contain: 1 person, playing a sport, stadium and outdoor
8.50 ची सरासरी
या कामगिरीमुळे विदर्भ संघाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्याने कामगिरीतील सातत्य दुसऱ्या सामन्यातही कायम राहले. उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांने केवळ १८ धावा देऊन पाच गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात मणिपूर विरुद्ध १५ धावा देत दोन गडी टिपले होते. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात २७ धावा देत एक बळी घेतला होता आणि आज, १४ नोव्हेंबर रोजी केरळ विरुद्ध झालेल्या सामन्यात ३४ धावा देत तीन बळी घेतले. तो या स्पर्धेमध्ये ८.५० च्या सरासरीने सर्वाधिक १४ बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. सरासरीच्या बाबतीत आणि गडी बाद करण्याच्या बाबतीतही तो सध्या आघाडीवर आहे.

Image may contain: 1 person, outdoor

कोण आहे दर्शना नळकांडे..?
दर्शन नळकांडे हा अकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू असून, वयाच्या आठव्या वर्षापासून तो क्लबसाठी सातत्याने खेळत आहे. त्यांच्या गोलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीने त्याला विदर्भ संघात स्थान मिळाले. तो विदर्भाकडून १४, १६, १९ आणि २३ वर्षाखालील संघात खेळला आहे. यासोबतच दोन वर्षांपूर्वी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारताच्या युवा संघाकडून तो इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सहभागी झाला होता. इंग्लंडमध्ये खेळणारा तो अकोल्यातील पहिला खेळाडू ठरला होता. मलेशियामध्ये आयोजित १९ वर्षांखालील खेळाडूंच्या आशिया करंडक स्पर्धेतही तो भारताच्या युवा संघाकडून खेळला होता. या संघाचे प्रशिक्षक भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड होते. आयपीएलच्या २०१८ च्या सिजनमध्ये त्याची किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली होती.

मुस्ताक अली स्पर्धेतील दर्शनची कामगिरी
संघ धावा/ बळी
त्रिपुरा 25/ 03
उत्तरप्रदेश 18/ 05
मणिपूर 15 / 02
राजस्थान 27 / 01
केरळ 34/ 03

आव्हान आत्मविश्वास वाढवितो
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आव्हान पेलावे लागते. आत्मविश्वास संतुलीत ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करावे लागते. टी-२० सामन्यांत गोलंदाज रडारवर असतातच; मात्र हेच आव्हान आत्मविश्वास वाढविण्यास सहाय्यक ठरते. एकूणच या स्पर्धेतील अनुभव भविष्यातील मोठ्या स्पर्धेतील आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
-दर्शन नळकांडे, गोलंदाज, विदर्भ संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola wicket taking bowler