Party.jpg
Party.jpg

आखाडा शांत; तोफा थंडावल्या!

अकोला : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा रविवारी (ता. 5) संध्याकाळी 5.30 वाजता थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या 53 व सात पंचायत समितींच्या 106 जागांसाठी मंगळवारी (ता. 7) मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता मतदार काय कौल देतात, हे येत्या 8 जानेवारी रोजी स्पष्ट होईल.

जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 18 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या 53 गटांतून निवडणूक लढवण्यासाठी 540 उमेदवारांनी 582 उमेदवारी अर्ज दाखल केले.

सात पंचायत समितींच्या 106 गणांतून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या 721 उमेदवारांनी 748 उमेदवारी अर्ज दाखल केले. संबंधित अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी केली असता छाननी अंती जिल्हा परिषदेच्या सात उमेदवारांचे 10, तर पंचायत समितींच्या सहा उमेदवारांचे 7 अर्ज अवैध ठरविण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 442 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदच्या 233 व पंचायत समितींच्या 209 उमेदवारांचा समावेश असल्याने जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितींसाठी 492 उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणातील उमेदवारांनी प्रचारासाठी मिळालेल्या सात दिवसांमध्ये त्यांचे मतदारसंघ पिंजून काढले. त्यातच गत दोन-तिन दिवसांपासून जवळपास सर्वच पक्षांच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी प्रचाराच्या मैदानात उतरून एकमेकांवर टिकेची झोड उठवली.

‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळविल्यानंतर संजय धोत्रे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात विधानसभेचा गड भाजपने राखण्यात यश मिळविले. भाजपचे चारही आमदार पुन्हा निवडून आले. शिवाय सोबत लढणाऱ्या शिवसेनेचा आमदारही निवडून आणला. आता केंद्रीय राज्यमंत्र्यांची खरी कसोटी लागणार आहे ती जिल्हा परिषदेचा गड राखताना. शिवाय ग्रामीणमध्ये विधानसभा मतदारसंघ असलेल्या तिन्ही आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या या आव्हानाला सामोर जाताना जिल्हा परिषदेचा गड कायम ठेवणार की लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच गत होणार यावरही वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय प्रतिष्ठा टिकून राहणार आहे. यापूर्वी सर्वांत मोठा पक्ष म्हणून ॲड. आंबेडकर यांच्या पक्षाने जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांमध्ये सत्ता गाजविली होती. यावेळी भाजपसह शिवसेना व काँग्रेस आघाडीचेही आव्हान त्यांच्यापुढे आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार नितीन देशमुख यांना पातूर व बाळापूर पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यासोबतच जिल्हा परिषदेतही शिवसेनेच्या जागा वाढविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यावरच त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत
निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. काही पक्षांना बंडोबांना शांत करण्यात यश आले असले तरी माघार घेतलेल्यांनी ‘काम’ दाखवू नये, यासाठी आता संबंधित पक्षांचे अधिकृत उमेदवार-नेते सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी भारिप-बमंस, भाजप सर्वच ठिकाणी स्वबळावर लढत असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. आघाडीत शिवसेना केवळ मूर्तिजापूर तालुक्यातील सात पैकी सहा जि.प. सर्कलमध्ये असून, उर्वरित ठिकाणी स्वबळावर लढत आहे. त्यामुळे कुठे तिरंगी, तर चौरंगी लढत होणार आहे. 

चुरशींच्या लढतींकडे लक्ष
जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या ‘चरशींच्या लढतींकडे’ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे जवळपास 10 दिग्गज रिंगणात आहेत. शिवसेनेचे जवळपास 12 प्रमुख पदाधिकारी नशीब अजमावत आहेत. कॉंग्रेसमधील नऊ दिग्गजांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पाच प्रमुख आजी-माजी पदाधिकारी रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी भारिप-बमंसमध्ये बारा दिग्गजांच्या लढती लक्षवेधक ठरणार आहेत. 

निवडणूक कार्यकर्त्यांची परीक्षा नेत्यांची 
जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या भाजपची शक्ती सर्वाधिक आहे. एक खासदार, पाच पैकी चार आमदार असून, महापालिका, तीन नगर पालिकाही तब्यात आहेत. शिवसेनेचा एक आमदार आहे. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे खासदार, सर्व आमदार, शिवसेनेचे आमदार, संपर्क प्रमुख प्रचारात उतरले होते. लोकसभा-विधानसभा एकत्र लढलेले भाजप-शिवसेना या निवडणुकीत मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 

आज रवाना होणार मतदान पथकं
निवडणुकीसाठी ईव्हीएम सील करण्याची कार्यवाही शुक्रवारी (ता. 3) पार पडल्यानंतर सोमवारी (ता. 6) दुपारनंतर मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना होतील. त्यासाठी निवडणूक विभागाने तयारी केली असून एसटी गाड्यांसह इतर खासगी गाड्यांचा ताफा सुद्धा तयार ठेवण्यात आला आहे. मतदान पथकातील मतदान केंद्राधिकारी, मतदान अधिकारी सोमवारी (ता. 6) सायंकाळनंतर ईव्हीएम घेवून त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहचतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com