‘अलबर्ट’ पदक मिळवणारा एकमेव भारतीय चांदागडातील

संदीप रायपुरे/नीलेश झाडे
सोमवार, 6 मे 2019

भेट मिळालेल्या जमिनीसाठी शासनाशी संघर्ष 
सामा वेलादी यांना दिलेल्या प्रशस्तिपत्रात त्यांना ब्रिटिश सरकारने दान दिलेल्या जमिनीचा उल्लेख आहे. १५ एकर जमीन मुडेवाही वनक्षेत्रात, १० एकर जमीन जार्जपेठा वनक्षेत्रात, तर  २० एकर  जमीन कक्ष क्र. २१ आणि ३१ मध्ये प्राणहिता नदीच्या काठावरील आहे. दान दिलेली ४५ एकर जमीन सध्या वनविभागाच्या ताब्यात आहे. ही जमीन परत मिळविण्यासाठी सामा वेलादी यांची मुले, नातवंडांचा संघर्ष सुरू आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ब्रिटिश सरकारने दिलेले पदक दाखविताना त्यांचा उर भरून येतो.

गोंडपिंपरी-धाबा (चंद्रपूर) - वाघाच्या जबड्यात सापडलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी एका आदिवासी युवकाने अद्भुत शौर्य दाखविले. त्याच्या शौर्यगाथेची पताका ब्रिटनमध्ये फडकली. दस्तूरखुद ब्रिटनचा राजा त्याच्या शौर्यावर मोहित झाला. राजाने स्वतः पुढाकार घेऊन त्याला ‘अलबर्ट’ पदकाने सन्मानित केले. ‘अलबर्ट’ पुरस्कार मिळविणारा हा एकमेव भारतीय ठरला. विभाजनपूर्व चांदा जिल्ह्यातील मुडेवाही येथील सामा वेलादी असे त्या शूरवीराचे नाव आहे. वेलादीच्या तिसऱ्या पिढीने आपल्या आजोबाचे पदक जपून ठेवले आहे. ब्रिटनच्या माध्यमांनी सामाच्या शौर्याची दखल घेतली. मात्र, दंडकारण्यालाच विस्मरण झाले.

सिरोंचा तालुक्‍यातील एका शूरवीराने दाखविलेल्या शौर्याची चर्चा ब्रिटनमध्ये झाली. सिरोंचाची ओळख सातासमुद्रापलीकडे घेऊन गेलेला हा शूरवीर सिरोंचा तालुक्‍यातील मुडेवाही येथील सामा वेलादी आहे. ९ नोव्हेंबर १९२४ रोजी फॉरेस्ट ऑफ दक्षिण चांदा डिव्हिजनचे डेप्टी कंजर्वेटर एच. एस. जॉर्ज हे सामा वेलादीला सोबत घेऊन सिरोंचा तालुक्‍यातील बेज्जूरपल्ली वनक्षेत्रात भटकंतीला  गेले. भटकंतीच्या दरम्यान वाघाने जॉर्ज यांच्यावर हल्ला केला.

जॉर्ज यांची मानगुटी जबड्यात घेऊन वाघ त्यांना फरपटत नेत होता. जॉर्ज यांच्यापुढे असलेल्या सामाने त्यांची किंचाळी ऐकली. तो मागे फिरला. त्याच्याकडे जॉर्जची बंदूक होती. मात्र, ती त्याला चालविता येईना. अशा बिकट स्थितीत सामाने हातातील बंदूक फेकली अन्‌ वाघाच्या दिशेने झेप घेतली. केवळ शारीरिक बळाने सामाने वाघाच्या जबड्यातून जॉर्जला सोडविले. जखम मोठी होती. अतिरक्तस्त्राव झाल्याने जॉर्ज बेशुद्ध पडला होता. आपल्या खांद्यावर जॉर्जला घेऊन सामाने गाव गाठले. त्याला मुडेवाही गाव गाठायला तब्बल सात दिवस लागले. सात दिवस वनौषधींच्या मदतीने सामाने उपचार केला अन्‌ जॉर्ज अधिकाऱ्याचे प्राण वाचविले. ब्रिटनच्या राजापर्यंत सामाची शौर्यगाथा पोहोचली. त्यांनी ‘अलबर्ट’ मेडल सामा वेलादी यांना जाहीर केले. नागपूर येथील एका सोहळ्यात सामा वेलादीला पदकाने सन्मानित करण्यात आले. सामा वेलादींना मिळालेले प्रशस्तिपत्र, पदक, चांदीचे कडे तिसऱ्या पिढीने आजही जपून ठेवले आहे.

ब्रिटनच्या माध्यमांनी केला गौरव
सामा वेलादी याचा शौर्यगाथेची ब्रिटनचा माध्यमांनी तोंड भरून कौतुक केले. ‘दी स्ट्रेट्‌स  टाईम्स’ने १५ जून १९२५ ला आपल्या अंकात ‘ इंडियन हीरो’ अशी उपाधी सामा वेलादी यांना बहाल केली. वेलादी यांची शौर्यगाथा पेज दोनवर त्यांनी छापली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Albert Award Indian Soma Veladi Bravery