दारूने केला घात; पत्नीचा जीव गेला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

गावोगावी भटकंती करीत उदरनिर्वाह करणाऱ्या गोपाळ समाजातील रूपचंद राऊत (वय 35, रा. झरपडा) याने पत्नीच्या डोक्‍यावर काठीने वार करून तिचा खून केला. ही घटना रविवारी (ता. 29) सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. मंगला रूपचंद राऊत (वय 30) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दारू पिऊन आल्यानंतर क्षुल्लक कारणावरून दोघांत भांडण झाले. यातून हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जाते. 

केशोरी (जि. गोंदिया) : केशोरी येथे शनिवारी (ता. 28) मंडई भरविण्यात आली होती. यानिमित्त गावात 5 नाटकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे झरपडा येथील रूपचंद राऊत पत्नी मंगला व मुलगी सावित्री (वय 3) व मुलगा विजय (वय 2) यांच्यासह केशोरी येथे आला. गाव व बाजारात फिरून पती-पत्नी दोघांनीही अन्नधान्य व काही पैसे गोळा केले. त्यानंतर त्यांनी बाजारवाडी चौकात मुक्काम ठोकला. 

असे का घडले? : 65 वर्षांनंतर पोहोचले आपल्या शाळेत

क्षुल्लक कारणावरून वाद 

रूपचंदने गोळा केलेल्या पैशातून रात्रीला दारू ढोसली व मुक्कामस्थळी आला. या वेळी पत्नीसोबत त्याचे क्षुल्लक कारणावरून रात्री अकराच्या सुमारास भांडण झाले. दरम्यान, रागाच्या भरात त्याने काठीने पत्नी मंगलाच्या डोक्‍यावर, हातावर व पायावर जबर मारहाण केली. यात ती जागीच गतप्राण झाली. 

 क्‍लिक करा : बलात्कार... तिने घेतले उंदीर मारायचे औषध

आरोपीला पोलिसांनी केली अटक 

रविवारी सकाळी बाजारवाडी चौकात काही नागरिक बाजार करण्याकरिता गेले असता, त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मंगलाचा मृतदेह दिसला. त्यांची दोन्ही लहान मुले मृतदेहाशेजारी होती. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंदला अटक केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Image may contain: 1 person, sitting, child and outdoor
गोंदिया : निरागस सावित्री व विजय एकाकी पडले आहेत.

मुले झाली पोरकी? 

आई मंगलाचा मृत्यू झाला. वडील रूपचंदला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे निरागस सावित्री व विजय एकाकी पडले आहेत. बोबडे बोल अन्‌ कळायच्या आत हा सारा प्रकार घडला. त्यामुळे ते आता कोणाकडे राहतील, त्यांना कोण आसरा देईल, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. घटनास्थळी बरेच जण हाच प्रश्‍न एकमेकांना विचारत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol consumption : wife muder at gondia