सावजीत दारूसह मटण पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या काळात २५१० गुन्हे दाखल करण्यात आले असून २ कोटी ८५ लाख ७ हजार २३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील २०४७ प्रकरणात २१४६ आरोपींना अटक करण्यात आली. ४६३ प्रकरणात आरोपींचा शोध लागला नाही. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद या आर्थिक वर्षांत झाली.

नागपूर - सावजी भोजनालयात येथेच्छ दारू पिऊन मटण, चिकनवर ताव मारणाऱ्या खवय्यांना चांगलेच महागात पडले आहे. रात्री अपरात्री सावजीत दारू सेवन करताना सापडलेल्या १२४ जणांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि दहा ते तीस दिवसांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. 

नागपूर शहर आणि ग्रामीण भागात ५०० च्यावर सावजीची दुकाने आहेत. या सावजीमध्ये मटणासोबत दारूचे सेवन करतात. दुकानातून दारू घ्यायची आणि सावजीत मटणाच्या रस्स्यासोबत ताव मारायचा अशी प्रथा येथे पडली आहे.

अनेक वर्षे यास कोणाची रोकटोक नव्हती. मध्यंतरी पाचशे मीटरच्या दारूबंदीच्या काळात हा व्यवसाय चांगलाच फोफावला होता. सावजी भोजनालयांकडे दारूचे परमिट नाही. कायद्यानुसार तेथे बसून दारू पिता येत नाही. अनेक बारमालकांनाही पर्यायी व्यवसाय खटकत होता. वारंवार तक्रारी येत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने याची दखल घेतली. सावजी भोजनालयांवर कारवाई करणे सुरू केले.  अधीक्षक प्रमोद सोनोने आणि रावसाहेब रुजू होताच कारवाईला वेग आला. गेल्या पाच महिन्यांत सावजीत अवैध दारूची पिण्याची ८१ प्रकरणे दाखल झाली. या प्रकरणात १२४ लोकांना न्यायायालकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. सावजीमध्ये दारू पिणाऱ्यांवर प्रथमच अशा प्रकारची शिक्षा झाल्याचे कळते.

Web Title: Alcohol Raid Crime Savaji Mess