चंद्रपूर जिल्ह्यात जात असलेली दारू पकडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

भिवापूर (जि.नागपूर) :  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे दारू घेऊन जात असलेले वाहन भिवापूर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-भिसी मार्गावर सालेभट्टी फाटा येथे करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींसह चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारू नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जमादार भगवान यादव, सिपाही विनोद भोयर, गोकुल सलामे, अनिल कोकुडे व राजन भोयर यांनी सालेभट्टी फाटा येथे पहाटेला नाकाबंदी केली. सहा वाजताच्या सुमारास नमूद वाहन उमरेडवरून भिसीच्या (जि.चंद्रपूर) दिशेने जात असल्याचे दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून झडती घेतली. त्यात प्लॅस्टिक पिशव्यात 384 देशी दारूच्या निप (अंदाजे 8 पेट्या) भरलेल्या आढळून आल्यात. दारूची किंमत 19968 रुपये असल्याचे समजते. पोलिसांनी वाहन चालक संकेत लिलेश्वर म्हैसकर (वय 33, शडेश्वर, ता. उमरेड) व त्याचा सहकारी अमीत योगराज बगले (वय 36,नांद)यांना अटक करून दारू व वाहन (अंदाजे किंमत चार लाख) जप्त केले. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार संतोष वैरागडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
अशी होते वाहतूक
अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेली दारू ही उमरेड येथील नगराळे यांच्या दारू दुकानामधून वाहनात भरण्यात आली होती. या दुकानामधून चंद्रपूर जिल्ह्यात नियमित मोठ्या प्रमाणात दारू पोहोचविल्या जात असल्याची माहती आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol was caught in Chandrapur district