व्हिडिओ...बघा शाळेतच गुरुजी कसे झिंगले ते... 

संदीप रायपुरे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शाळा सुरू झाली. विद्यार्थीही दप्तरासह शाळेत आले. पुस्तक वाचन करून विद्यार्थ्यांनी शाळेची सुरुवात केली अन्‌ शिक्षकानेही मद्यप्राशन करून शाळेला मधुशाला बनविले.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन शिक्षकी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक शिक्षक सुटीवर होता. दुसऱ्याकडे शाळेची जबाबदारी होती. शाळेतच दारूचे दोन डोज झाल्याने त्याला चांगलीच चढली. मग काय दारू उतरविण्यासाठी खेळाचे निमित्त साधून तो 27 विद्यार्थ्यांसह मैदानात उतरला. अनं तोल गेलाच. तळीराम मास्तराला सांभाळता सांभाळता विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले. गावकऱ्यांपर्यंत गोष्ट गेली अन्‌ शाळेला मधुशाला बनविणाऱ्या मास्तराला थेट ठाण्यात पोहचविण्यात आले. चंद्रपुरातील दारूबंदी किती फसवी अनं गंभीर ठरत आहे, याचा प्रत्यय या घटनेतून आला. 

गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधी भंगारपेठजवळ जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 27 विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी शाळेतील एक शिक्षक रजेवर होता. त्यामुळे एकाच शिक्षकावर शाळेची जबाबदारी आली. शाळा सुरू झाली. विद्यार्थीही दप्तरासह शाळेत आले. पुस्तक वाचन करून विद्यार्थ्यांनी शाळेची सुरुवात केली अन्‌ शिक्षकानेही मद्यप्राशन करून शाळेला मधुशाला बनविले. बरीच दारू ढोसल्यानंतर जरा जास्तच झाल्याची जाणीव झाल्याने आता काय करायचे, हा प्रश्‍न त्याला पडला. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: एक किंवा अधिक लोक, लोकं बसली आहेत, बूट, गवत, बाहेरील आणि निसर्ग
शाळेला मधुशाला बनविणाऱ्या मास्तराला  ठाण्यात पोहचविण्यात आले

दारू उतरविण्यासाठी त्याने मैदानात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सांगितले. आपलीही जरा उतरेल, हा त्यामागचा हेतू होता. पण, झाले उलटेच. दारूच्या अतिसेवनाने त्याचा तोल ढासळला. अनं तो तिथेच लेटला. विद्यार्थीही घाबरले. खेळ अनं शिक्षणाचे सारे सोपस्कार सोडून ते मास्तराला सांभाळण्याच्या भानगडीत पडले. इकडे गावात या प्रकाराची माहिती झाली अन्‌ मागचा पुढचा विचार न करता त्यांनी पोलिस ठाण्यात फोन लावला. पोलिसांचे वाहन शाळेत आले. शाळा व्यवस्थापन समितीची चमूही घटनास्थळी दाखल झाली. 

हेही वाचा : तळीरामांसाठी पिण्यासोबत खाण्याचीही सोय

मग काय त्या शिक्षकाची रवानगी थेट ठाण्यात झाली. वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. चंद्रपूरच्या दारूबंदीला चार वर्षे पूर्ण झाली. पण, ती पुरतीच फसवी ठरली आहे. लहान लहान मुले ड्रग्जच्या आहारी जात आहेत. यातूनच अनेक दारूतस्कर होत आहेत. आता तर ही दारू शाळेतही पोहचल्याने प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. शाळेला मधुशाला बणविण्याच्या या शिक्षकाच्या प्रतापाबाबत आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

प्रशासन आहे कुठे? 

गोंडपिपरीचे प्रशासन हल्ली अगदीच सुस्त झाले आहे.कुणाचे कुणावर नियंत्रण नाही.पंचायत समितीच्या कारभारात गोंधळच गोंधळ आहे.पदाधिकारीही पराभूत मानसिकतेतून बाहेर यायला तयार नाहीत अशात मास्तराने शाळेची तब्बेत बिघडविल्याने आता याप्रकरणी कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alcoholic teacher dance at school