स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क 

स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क 

भंडारा - सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच राज्यातील काही भागात स्वाइन फ्लूची साथ सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात व स्वाइन फ्लूपासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी केले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघात व स्वाइन फ्लूसाठी लागणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गुरुवारी आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनीता बढे, डॉ. चाचरकर, डॉ. रवी कापगते, डॉ. श्रीकांत आंबेकर, रेडक्रॉस सोसायटी, आयएमए, फॉग्सी, आयपीए, निमा, फुटपाथ युनियन, ऑटो रिक्षाचालक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यात इन्फ्ल्युएन्झा एच 1 एन 1 च्या रुग्णामध्ये वाढ झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये इन्फ्ल्युएन्झा प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वाइन फ्लू असेल या संशयाने तपासण्यात यावे व उपचार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे दोन विलगीकरण कक्ष असून एक सामान्य रुग्णालय येथे आणि दुसरा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थामध्ये सदर आजाराची तपासणी व उपचार केल्या जातात. जिल्ह्यात एकूण 8 आयसीयू बेड व 7 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सदर आजारावर उपचाराकरिता लागणारी ऑसेलॅमीवीट औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. 

संशयित स्वाइन फ्लू रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी आहेत. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्वाइन फ्लू टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पौष्टिक आहार, धूम्रपान टाळणे, पुरेशी विश्रांती व भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. 

ताप नियंत्रण प्रणालीत बिघाडाने उष्माघात 
उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराच्या नैसर्गिक ताप नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद्‌भवणारा जीवघेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजुरीचे फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या ठिकाणी काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृति आराखडा राबविला असून अहमदाबादमध्ये याची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिल, मे व जून या महिन्यात 43 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यांत मृत्यूचे प्रमाण अधिक असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com