गोसेखुर्द धरणाची 33 दारे उघडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, गोंदिया जिल्ह्यातील धरणाचा सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शुक्रवारी गोसेखुर्दची 33 वक्रद्वारे उघडण्यात आली आहेत.

पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, गोंदिया जिल्ह्यातील धरणाचा सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शुक्रवारी गोसेखुर्दची 33 वक्रद्वारे उघडण्यात आली आहेत.
भंडारा जिल्ह्यात सोमवारपासून संततधार पाऊस झाला. दरम्यान, मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वैनगंगेच्या पात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजतापासून गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजता 17 द्वारे एक मीटरने आणि 16 द्वारे प्रत्येकी अर्धा मीटर उघडली आहेत. या धरणातून 5308 क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पवनी व लाखांदूर तालुक्‍यात वैनगंगा नदी फुगली आहे. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदी पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे पाणी आल्याने धोक्‍याच्या पातळीजवळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all 33 gates of gose dam opened