हत्तींना वेतन आयोग, साप्ताहिक सुटी आणि निवृत्तीवेतनही

राज इंगळे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चार हत्ती आहेत. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात येतात. सोबतच दररोज सकाळी गूळ-पोळीचा नाश्‍ता दिला जातो.

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या कामकरी हत्तींना व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळत असल्याने त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे या हत्तींना कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगानुसार सुट्या, साप्ताहिक रजा अन्‌ सेवानिवृत्तीही लागू असल्याची माहिती मेळघाट व्याघ्रप्रकल्प संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: बाहेरील आणि निसर्ग

मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चार हत्ती आहेत. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्यात येतात. सोबतच दररोज सकाळी गूळ-पोळीचा नाश्‍ता दिला जातो. विशेष म्हणजे, हे हत्ती रात्रभर जंगलात भटकंती करून या नाश्‍त्यासाठी न चुकता स्वत:हून ठरलेल्या ठिकाणावर हजर होतात.

Video : नावालाच 'सुपर'; येथे चालतो रुग्णांच्या जिवाशी खेळ
 

हे हत्ती वेतन आयोगानुसार सर्व सुट्या उपभोगतात, शिवाय आठवड्यातून एक दिवस त्यांना साप्ताहिक रजाही दिली जाते. वर्षातून एकदा तीस दिवसांची सलग रजा असते आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे या हत्तींनाही व्याघ्र प्रकल्पाच्या सेवेत वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती दिली जाते. 

निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून शासनाकडून त्याला नियमित अर्धा आहार पुरविण्याची तरतूद आहे. मरेपर्यंत जंगलातील चारा खाण्याची मुभा आहे. मेळघाटातील व्याघ्रप्रकल्प क्षेत्रांतर्गत वन आणि वन्यजीव संरक्षणार्थ व पर्यटन यात या हत्तींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या प्रत्येक हत्तीचे एक स्वतंत्र डाएट रजिस्टर असून, कामाची नोंद घेणारे लॉगबुकसुद्धा आहे. यात हत्ती कधी व कुठून आले याच्याही नोंदी असल्याचे मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राणीसंवर्धन आणि इतर प्रशासनासमोर आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. विषेश म्हणजे मेळघाट व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: बाहेरील आणि निसर्ग

येथे येणारे पर्यटक हत्तीवरील भ्रमंतीला पसंती देतात. त्यामुळे मनुष्याप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा अधिक कमाई करण्यात हत्ती अग्रेसर आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेत कोणतीही कमी राहू नये, याशिवाय मनुष्यासोबत वन्यप्राणीही तेवढेच महत्त्वाचे असल्याचा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. 

महिलांनो, न सांगता बाहेर जाऊ नका! अन्यथा पतीचा जीव येईल धोक्‍यात...

 

दहा किलो पीठ, एक किलो गूळ

हत्तीला एका दिवसाला दहा किलो पीठ, एक किलो गूळ, एक पाव तेल, एक पाव मीठ एवढे रेशन शासनाच्या वतीने पुरविले जाते. यामध्ये दररोज सायंकाळी तेल, मीठ, पीठ एकत्र करून त्याच्या पोळ्या बनविल्या जातात. यातील पोळ्या गुळासोबत त्याला सायंकाळच्या जेवणात दिल्या जातात. त्यानंतर हत्ती सायंकाळच्या जेवणानंतर आपल्या नियोजित ठिकाणावरून जंगलात चरायला निघून जातात. या कामासाठी दररोज दोन कर्मचारी हत्तीच्या सेवेत असतात. 

 

हत्तींची मोलाची भूमिका

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हत्तीवरील सवारी विशेष आकर्षण ठरत आहे. व्याघ्र हत्ती कमाईचे साधन बनले आहे. सोबतच मेळघाटातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यास मोलाची भूमिका बजावत आहेत. कठीण ठिकाणावरून लाकूड काढण्यास त्यांची मोठी मदत होते. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पासाठी हत्ती मोलाची भूमिका बजावत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All facilities as employees for the elephants in the Melghat project