फक्त 45 टक्‍के पीककर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : बड्या व्यक्तींना कर्ज वाटपासाठी पुढे सरसावणाऱ्या बॅंकांनी शेतकऱ्यांसाठी हात आखडते घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 42 हजार शेतकऱ्यांना 445 कोटी म्हणजे एकूण उद्दिष्टाच्या फक्त 45 टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. कर्ज मिळण्यास होत असलेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, दोन वर्षांत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही. यामुळेही बॅंकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याची माहिती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी करण्यात आले. खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यासाठी यंदा 979 कोटी 95 लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाकडून निश्‍चित केले आहे. साधारणत: शेतकरी कर्जासाठी मे महिन्यापासून अर्ज करतात. जून महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होत असल्याने पैशाची गरज असते. जुलै महिन्यापर्यंत निम्मेही उद्दिष्ट गाठता आलेले नाही.
31 जुलैपर्यंत 42 हजार 67 शेतकऱ्यांना 445 कोटी 54 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. आता शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी कमी होणार असल्याने ही टक्केवारी 60च्या पुढे जाणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी तर 50 टक्‍क्‍यांचा आकडाही बॅंकांनी गाठला नसल्याचे सांगण्यात येते. बॅंकांच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहे. परंतु, त्यांना कर्जच मिळत नसल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocation of 45% loan