अनेक वादळे आली, तरी हिंदू हा हिंदूच राहिला

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : भारताने अनेक परकीय आक्रमणे बघितली. अनेक राज्यकर्ते आले. तरीही हिंदू हा हिंदूच राहिला. भारतीय हिंदूंची वृत्ती सर्वसमावेशक आहे. ती प्रत्येकाला आपले मानते. सहनशीलता हा भारतीय संस्कृतीचा गुणधर्म आहे. मला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करणे हा याच वृत्तीचा विजय असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्‍त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा विदर्भ साहित्य संघाने प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी भावना व्यक्‍त केल्या. माझी अध्यक्षपदी विराजमान होण्याची पात्रता नव्हती. मला ही संधी मिळेल हे माझ्या ध्यानी, मनी, स्वप्नीदेखील नव्हते. साहित्य महामंडळाने मन मोठे केले अन्‌ माझा गौरव केला अशा भावना फादर दिब्रिटो यांनी व्यक्‍त केल्या. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले. कार्यक्रमाला वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार, विलास मानेकर, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, वसंत वाहोकर, रवींद्र शोभणे, शुभदा फडणवीस, नरेश सब्जीवाले यांच्यासह इतर साहित्यप्रेमी उपस्थित होते.

साहित्यिकांनी परखड भूमिका मांडावी
मराठी आमची मातृभूमी आहे, असे अभिमानाने सांगणारे साहित्यिकच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी समर्थ नाहीत. खरे पाहता मराठी साहित्यिक संघर्षाच्या प्रश्नांवर भूमिका मांडतच नाहीत. हा कचखाऊपणा आहे. मुळात भूमिका घेणारे निर्भयी असावे. मात्र, ज्यांचे हात दगडाखाली असतील ते कधीच भूमिका मांडू शकत नाहीत. आपल्याला लाचारीची संस्कृती निर्माण करायची आहे का असा सवाल उपस्थित करत मराठी साहित्यिकांनी परखड भूमिका मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पुरस्कार वापसीचा हेतू ओळखा
मधल्या काळात काही साहित्यिकांनी पुरस्कार परत केलेत. मी कोणताही सरकारी पुरस्कार घेत नाही. त्यामुळे सरकारी पुरस्कार कोणी घ्यावे अन्‌ कोणी परत करावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मला त्याबाबतीत बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगून साहित्यिकांच्या पुरस्कार वापसीच्या मागचा हेतू शासनकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

भारतीय संस्कृतीला धक्‍का?
चारशे वर्षांपूर्वी मिशनरी भारतात आलेत. येथे राहून भारतीय भाषा शिकले. संत साहित्याचा अभ्यास केला. स्त्रियांवर होत असलेले अन्याय पाहून स्त्री-पुरुष समानतेचे कार्य उभारले. मात्र, मिशनरींना भारतात येण्यापूर्वी त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितले होते की, भारतीय धार्मिक देश आहे. भारतीयांच्या संस्कृतीला धक्‍का पोहोचवू नका. दुर्दैवाने तसे झाले नसल्याची खंत दिब्रिटो यांनी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com