तुरीला ‘अमरवेल’चे ग्रहण!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

अकोला : जमिनीला कोरड पडल्याने आधिच तूर, कपाशी उत्पादक चिंतेत आहेत. अशात संपूर्ण तुरीचे पिकच अमरवेल तणाच्या विळख्यात सापडल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अकोला, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन, तुरीच्या पिकांत अमरवेलचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे.

अकोला : जमिनीला कोरड पडल्याने आधिच तूर, कपाशी उत्पादक चिंतेत आहेत. अशात संपूर्ण तुरीचे पिकच अमरवेल तणाच्या विळख्यात सापडल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. अकोला, अकोट तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन, तुरीच्या पिकांत अमरवेलचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे.

न मरणारी म्हणून ही ‘अमरवेल’ या तणाची ओळख आहे. त्यामुळे एकदा अमरवेलचा प्रादुर्भाव झाला की, वर्षोगणती तो दिसून येतो. अकोला, अकोट, बार्शीटाकळी तालुक्यातील बहुतांश भागात या तणाचा प्रादुर्भाव काही वर्षापासून वाढत असून, अकोला तालुक्यातील कोरडवाहू भागात त्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. दहीगाव, पळसो, धोतर्डी, बहीरखेड, सांगळूद, याऊलखेड, अन्वी मिर्झापूर, रामगाव व लगतच्या भागात अमरवेलने तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने येथील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

कृषी विभागही हतबल
अमरवेल या तणावर ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व कृषी विभागाला शोधता आली नाही. त्यामुळे अमरवेलचा नायनाट करणे अशक्य झाले असून, अमरवेलच्या प्रादुर्भावापासून बचावात्मक सल्ल्याशिवाय कृषी विभागाकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही आहे.

या पिकांमध्ये प्रादुर्भाव
एरव्ही टोमॅटो, गाजर व भाजीपाला पिकांमध्ये अमरवेलचा प्रादुर्भाव अधिक होतो. मात्र सोयाबीन, तूर या पिकांमध्येही अमरवेलचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

काय आहे अमरवेल?
अमरवेल ही पर्णविरहित, पिवळसर, हंगामी मुळशीवाय वेलीच्या स्वरुपात धाग्याप्रमाणे ठराविक वनस्पतींच्या खोडावर, फांद्यावर वाढून त्या वनस्पतीचा अन्नांश शोषणारी पूर्णतः परोपजीवी वनस्पती आहे. यात प्रचंड बीजनिर्मिती क्षमता असून, हे बीज पाण्याशिवाय 8 ते 10 वर्ष सातत्याने उगवते. कुंपणावर, घास, फांद्यांवर साखळी स्वरुपात वाढते.

उपाय नव्हे नियंत्रण
अमरवेलाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाच टक्के मिठाच्या पाण्याची बियाण्यावर प्रक्रिया करावी. शेणखत, कंपोस्ट खत अमरवेल विरहीत असावं. कृषीऔजारं स्वच्छ धुवावीत. अमरवेलाचा प्रसार करणाऱ्या पाण्याचा, मातीचा, जनावरांचा, माणसांचा वावर कमी करावा. प्रसार टाळण्यासाठी नांगरट करावी. भात, गहू, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, कापूस ही अमरवेलविरोधी पिकं घ्यावीत. अमरवेल फुलं आणि बीजनिर्मिती अगोदर काढून जाळून टाकावा. 33 मिली पेंडीमिठीलीन 6 लिटर पाण्यातून फवारावे अगर वाळूत मिसळून एकसारखं पसरावं.

Web Title: amarwel on pulse crop