आंबेकरचा "राईट हॅंड' सराफा व्यापाऱ्याला अटक 

file photo
file photo

नागपूर : कुख्यात झोपडपट्टी डॉन संतोष आंबेकर याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा "राईट हॅंड' सराफा व्यापारी राजा ऊर्फ राजेंद्र अरमरकर (45, रा. खरे टाऊन, धरमपेठ) याला गुन्हे शाखेने अटक केली. राजाच्या अटकेमुळे आंबेकर आर्थिक अडचणीत सापडला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली. राजाचे इतवारीतील सराफा ओळीत अरमरकर ज्वेलर्स नावाने मोठे दुकान आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉन आंबेकरने गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांची पाच कोटींनी फसवणूक केल्यानंतर एक कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. तीन दिवसांनंतर सोनेगाव पोलिस ठाण्यात गुजरातच्या अन्य व्यापाऱ्यांची 70 लाखांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. दोन्ही प्रकरणात आतापर्यंत संतोष आंबेकरचे दोन्ही भाचे नीलेश केदार आणि सनी वर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे. जिगरभाई यांच्या फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. 
दोन दिवसांपूर्वी संतोष आंबेकरने डॉक्‍टर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ठार मारण्याची धमकी देत सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार केल्याची तक्रार लकडगंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणात संतोष आंबेकर याच्यावर बलात्कारासह पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. रविवारी गुन्हे शाखा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या पथकाने संतोष आंबेकरचा आर्थिक व्यवहार हाताळणारा इतवारीतील सराफा व्यापारी राजा अरमरकर याला अटक केली. त्याच्याकडे संतोषच्या खजिन्याची चाबी असल्याची चर्चा आहे. राजाची सराफा गल्लीत बैठक होती. तो संतोषच्या पैशाची विल्हेवाट लावत होता किंवा आर्थिक व्यवहार सांभाळत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
जुही, राजा मास्टर माईंड 
डॉन आंबेकरची मुंबईतील गर्लफ्रेंड जुही चौधरी आणि सराफा व्यापारी राजा अरमरकर हे दोघे आंबेकरचा काळा पैसा गुंतवणूक करीत होते. राजानेच संतोषला हवाला चॅनल सेट करून दिले होते. पोलिसांनी राजाला अटक करताच घराची आणि दुकानाची झडती घेतली. यामध्ये फसवणुकीशी संबंधित काही कागदपत्रे मिळाल्याची माहिती आहे. नुकताच संतोषने स्वतःच्या घराजवळील भूखंडाचा साडेपाच कोटींनी सौदा केल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com