नागपुरात अटक केलेला अमेरिकन नागरिक हेर?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

याशुवा 2013 मध्ये भारतात आला होता. तेव्हापासून तो भारतातच आहे. त्याच्या व्हिसाची मुदतही संपली आहे. सध्या तो नागपुरातील भाड्याच्या घरात राहतो. त्याच्यासोबत नागपुरातील दीपाली नावाची तरुणी राहते. या दोघांनी विवाह केल्याचे समजते. याशुवा व दीपाली नेमके काय करतात, याबद्दल अद्यापही पोलिसांना निश्‍चित माहिती मिळाली नाही

नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात "व्हिसा'ची मुदत संपल्यानंतरही आलिशान जीवन जगणाऱ्या अमेरिकन नागरिकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. अमेरिकेच्या सैन्यदलातून निवृत्त झालेला हा नागरिक हेरगिरी करण्यासाठी तर भारतात राहिला नाही ना, या दिशेनेही नागपूर पोलिस तपास करीत आहे. 

याशुवा मेसियाक लॅबोविथ (वय-35) असे या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. याशुवा 2013 मध्ये भारतात आला होता. तेव्हापासून तो भारतातच आहे. त्याच्या व्हिसाची मुदतही संपली आहे. सध्या तो नागपुरातील भाड्याच्या घरात राहतो. त्याच्यासोबत नागपुरातील दीपाली नावाची तरुणी राहते. या दोघांनी विवाह केल्याचे समजते. याशुवा व दीपाली नेमके काय करतात, याबद्दल अद्यापही पोलिसांना निश्‍चित माहिती मिळाली नाही. परंतु दोघांचेही जीवन आलिशान असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. याशुवा प्रारंभी धर्मप्रसाराचे कार्य करीत होता. तेव्हा तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. दीपालीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने भाड्याच्या घरात बस्तान हलविले. याशुवाची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. 

आता पोलिसांच्या रडारवर दीपाली ही तरुणी आहे. ही तरुणी याशुवाच्या संपर्कात कशी आली? व्हिसा संपल्यानंतरही याशुवाच्या भारतात राहण्याचा उद्देश काय? व्हिसाची मुदत वाढविण्यासाठी कार्यवाही का केली नाही? येथे राहण्यासाठी या दाम्पत्याला कोण मदत करीत आहे? या प्रश्‍नांभोवती आता तपास फिरत आहे. याशुवा अमेरिकेचा हेर असल्याचा कोणताही पुरावा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही तरी या दिशेनेही तपास केला जाऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. 

Web Title: American Spy arrested in Nagpur?