बच्चनले पाहू द्या ना वं!

Amitabh-Bachchan
Amitabh-Bachchan

नागपूर - ‘झुंड’ चित्रपटाच्या ‘शूटिंग’च्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन चार दिवसांपासून उपराजधानीत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड तगमग सुरू आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्त व ‘बाउन्सर्स’च्या मनमानीमुळे त्यांची घोर निराशा होत आहे. अगदी घराच्या पल्याड ‘शूटिंग’ सुरू असूनही परिसरातील नागरिकांना अद्याप महानायकाचे दर्शन झालेले नाही.

‘सैराट’ फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित व टी-सिरीजचे भूषणकुमार निर्मित ‘झुंड’चे ‘शूटिंग’  तीन-चार दिवसांपासून मोहननगर (गड्डीगोदाम) येथील सेंट जॉन्स स्कूल परिसरात सुरू आहे. ‘शूटिंग’साठी ‘बिग बी’ यांचे सोमवारी शहरात आगमन झाल्यापासून चाहत्यांना चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. ‘शूटिंग’जवळून पाहायला मिळेल, या आशेने शेकडो चाहते दररोज शाळेच्या परिसराला चकरा मारताहेत. मात्र, ‘शूटिंग’ तर दूर त्यांना अजूनपर्यंत ‘बिग बी’ची साधी झलकसुद्धा पाहायला मिळाली नाही.

चित्रपटाचे ‘शूटिंग’ निर्विघ्न पार पडावे यासाठी मुंबईच्या ‘बाऊन्सर्सं’ना पाचारण केले आहे. हे धिप्पाड ‘बाऊन्सर्स’ शाळेच्या सभोवताल तैनात आहेत.

चित्रीकरणाशी संबंधित व्यक्‍ती वगळता कुणालाही आतमध्ये प्रवेशबंदी केली आहे. प्रसारमाध्यमांसह परिसरात राहणाऱ्यांनाही ‘शूटिंग’ पाहण्यास मनाई आहे. त्यांच्या घराच्या छतावरदेखील ‘बाऊन्सर्स’चा दिवसरात्र पहारा आहे. अगदी घराजवळ अमिताभ बच्चन ‘शूटिंग’ करीत असूनही, त्यांची साधी झलकदेखील पाहायला मिळत नसल्याने चाहते दु:खी आहेत.

‘शूटिंग’ पाहण्यासाठी शहरातून नव्हे विदर्भातूनही दररोज शेकडो चाहते येथे येताहेत. ‘बिग बी’ची झलक पाहण्यासाठी दिवसभर शाळेच्या भोवताल तासनतास ते चकरा मारताहेत. ‘बिग बी’च्या कारचा ताफा येतो आणि शाळेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करतो. कारला काळ्या काचा असल्यामुळे नागपूरकरांना बच्चन यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

छतावरही जाण्याची नाही परवानगी
‘सकाळ’ने गड्डीगोदाम परिसरात राहणाऱ्या महिला चाहत्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्या म्हणाल्या, आमच्या घराजवळ महानायकाचे ‘शूटिंग’ सुरू असूनही ‘बाऊन्सर्स’मुळे पाहण्याची  संधी मिळत नाही. घराच्या छतावरही जाण्याची परवानगी नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्याचवेळी चित्रपटाच्या निमित्ताने गड्डीगोदाम परिसर बॉलीवूडच्या नकाशावर येणार असल्याचे त्यांना समाधान आहे.

नागपूरकरांचा असाही जुगाड!
‘शूटिंग’चे फोटो व्हायरल होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात येत असली तरी जुगाडू  नागपूरकर त्यातूनही मार्ग काढत आहेत. अनेक जण ‘बाउन्सर्स’ची नजर चुकवून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे ‘बिग बी’चे शूटिंगचे व्हिडिओ व फोटो काढून सोशल मीडियावर ‘व्हायरल’ करीत आहेत. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून का होईना त्यांना महानायकाचे दर्शन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com