अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या निवडीचा घोळ संपेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्‍त्या अद्यापही करण्यात न आल्याने आगामी परीक्षा उशिरा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या विद्यापीठात असलेल्या सत्ताधारी संघटनेच्या अंतर्गत राजकारणामुळे या नियुक्‍त्या थांबल्याचे वृत्त आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्‍त्या अद्यापही करण्यात न आल्याने आगामी परीक्षा उशिरा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या विद्यापीठात असलेल्या सत्ताधारी संघटनेच्या अंतर्गत राजकारणामुळे या नियुक्‍त्या थांबल्याचे वृत्त आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विविध विद्याशाखांची 60 अभ्यासमंडळे आहेत. अभ्यास मंडळावर निवडून आलेल्या सदस्यांनंतर कुलगुरूंनी काही सदस्य नॉमिनेट केल्याने सदस्यसंख्या पूर्ण झाली आहे. या सदस्यांची बैठक बोलावून त्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रथम निवड करणे आवश्‍यक आहे. त्यातून कोऑपशन करून अभ्यासमंडळाचा अध्यक्ष निवडणे गरजेचे असते. परंतु, विद्यापीठात अभ्यासमंडळाच्या सदस्यांच्या नियुक्‍त्या होऊन जवळपास सहा-सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. विद्यापीठाच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून अभ्यासमंडळे ही विद्यापीठात अतिशय महत्त्वाचे आहे. परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकांसाठी पॅनल देणे ही जबाबदारी अभ्यासमंडळाची असते. अभ्यासमंडळ गठित करून अध्यक्ष निवडल्याशिवाय पॅनल तयार होत नाही. पॅनल तयार झाल्यावर प्रत्येक शाखानिहाय विषयाच्या प्रश्‍नपत्रिकांचे संच काढण्याचे काम पॅनेलवरील सदस्य करतात. पॅनल जर तयार नसेल, तर परीक्षांचे प्रश्‍नपत्रिकासंच परीक्षाविभागाकडे त्वरित तयार नसतील. प्रश्‍नपत्रिकांचे संचच जर वेळेवर मिळाले नाहीत, तर परीक्षाविभागाला 600 परीक्षांचे नियोजन करणे शक्‍य होणार नाही. परिणामी विद्यापीठाच्या पुढील हिवाळी व उन्हाळी परीक्षा लांबणीवर पडण्याची दाट शक्‍यता आहे.
नियमित कुलसचिव; तरी बैठका नाही
मध्यंतरीच्या काळात नियमित कुलसचिव नसल्याने अभ्यासमंडळाच्या सदस्यांच्या बैठका बोलविता येत नव्हत्या. त्यामुळे अध्यक्षाच्या नियुक्‍त्या थांबल्या होत्या. आता विद्यापीठाला नियमित कुलसचिव असतानाही अभ्यासमंडळाच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठप्पच आहे. यामध्ये विद्यापीठातील सत्ताधारी संघटनेअंतर्गत असलेले राजकारण जबाबदार असल्याचे बोलले जाते; मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

अभ्यासमंडळाच्या सदस्यांच्या बैठका दोन-चार दिवसांत सुरू होतील. बैठकाबाबतची कारवाई पूर्ण झाली असून कुलगुरूंच्या पत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या की, सदस्यांच्या बैठका सुरू होऊन त्यातून लवकरच अध्यक्षाची निवड होईल.
-डॉ. तुषार देशमुख,
कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amr university : Dissociate the selection of the President of the Study