अमरावती अपर आयुक्त कार्यालय प्रभारीकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

अमरावती : बारा जिल्हे आणि सात प्रकल्प कार्यालयांचा डोलारा सांभाळणाऱ्या अमरावती आदिवासी अपर आयुक्तालयाला आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर अद्याप कायमस्वरूपी अपर आयुक्त (एटीसी) मिळाले नाही. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज प्रभारींच्याच भरवशावर सुरू आहे.

अमरावती : बारा जिल्हे आणि सात प्रकल्प कार्यालयांचा डोलारा सांभाळणाऱ्या अमरावती आदिवासी अपर आयुक्तालयाला आयएएस अधिकाऱ्याच्या बदलीनंतर अद्याप कायमस्वरूपी अपर आयुक्त (एटीसी) मिळाले नाही. त्यामुळे या कार्यालयाचे कामकाज प्रभारींच्याच भरवशावर सुरू आहे.
आतापर्यंत अपर आयुक्त म्हणून पी. प्रदीपचंद्रन कार्यरत होते. शासनाच्या बदली धोरणानुसार त्यांची वर्षभरातच बदली झाली. त्यानंतर अमरावती एटीसी पदाचा भार नागपूर येथील अपर आयुक्त राठोड यांच्याकडे सोपविला. नागपूर हे राज्याची उपराजधानी शिवाय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने तेथून अमरावती विभागाचा डोलारा सांभाळणे तारेवरची कसरत आहे. त्यामुळे प्रशासकीय निर्णय तातडीने घेता येत नाहीत. शिवाय मुख्य अधिकारीच आठवड्यातून काही दिवस हजर राहणार असल्यामुळे या कार्यालयात कार्यरत कर्मचारी, अधिकारी बिनधास्त झालेले आहेत. चालू शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाचा प्रश्‍न आणि नामांकित शाळा प्रवेशाचा मुद्दा कायम आहे. अधिनस्त अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी घेण्यासाठी प्रभारी अधिकारी अमरावतीत येण्याची वाट बघावी लागते. या विभागाकडून आदिवासींच्या इतरही विकासाच्या योजना राबविल्या जातात. त्यातही काही प्रमाणात विलंब होत असल्याचे दिसून येते.

वरिष्ठस्तरावरून लॉबिंग सुरू
अमरावती एटीसी पदावर आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास तातडीने कामे पूर्ण होतात. प्रशासनावरसुद्धा वचक राहतो. परंतु, या पदावर वनविभाग, महसूल विभागातील अधिकारी उत्सुक आहेत. त्यासाठी काहींनी मंत्रालयस्तरावरून प्रयत्न सुरू केल्याची विश्‍वसनीय माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati advasi department news