वर्षभर डोक्यावर हंडा; मुलगी कशी द्यायची हो!

हातपंप
हातपंपe sakal

अकोला : ‘निसर्गाची करणी आणि नारळात पाणी’ अशी एक म्हण आहे. समुद्र किनाऱ्यावरील नारळात गोड पाणी भरण्याची किमया निसर्गानं साधली. पण, त्याच निसर्गानं समुद्रापासून पाच-सहाशे किलोमीटर दूर असलेल्या पूर्णा नदीच्या पट्ट्यात खारं पाणी (saulty water) भरलं आहे. अमरावती (amravati), अकोला (akola), बुलडाणा (buldana) या तिन्ही जिल्ह्यांतील पूर्णा नदीकाठच्या (purna river bank) लोकांचे जीवन पाण्यामुळे खारट झालं आहे. पूर्णेच्या दोन्ही काठांवरील पंधरा-पंधरा किलोमीटरचा परिसर खारपाण पट्ट्याच्या संकटानं व्यापला आहे. डोक्यावर हंडा घेऊन जाणाऱ्या महिला, किडन्यांचे रुग्ण ही या भागाची खास ओळख... सिंचन होत नसल्यानं शेतीही आतबट्ट्याची... अशा भागात मुलगी देण्याची हिंमत बापाला होत नाही. (amravati akola and buldana district facing drinking water issue)

बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना, केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती अन् उन्हाच्या तीव्र झळा हेच प्राक्तन हा भाग भोगतोय. अनेक सरकारं आली गेली; पण सहानुभूतीशिवाय हाती काहीही नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीही बरंच संशोधन केलं, उपायही शोधले; पण सरकारी आश्रयाशिवाय ते तोकडे आहेत. खारपाणपट्टयासाठी सर्वव्यापी उपायांची गरज आहे. दरवर्षी पाण्यासोबत वाहून जाणारी लाखमोलाची मृदा वाचविणे गरजेचे आहे. तसं पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्थाही होणं आवश्यक आहे. छोटे-छोटे सिंचन प्रकल्प मार्गी लागले तर या भागाचा कायापालट होईल. केवळ सहानुभूतीचे डोस नाही तर ठोस मदतीची आणि सर्वस्तरीय विकासाची आस या भागाला आहे. ती कधी पूर्ण होईल?

बाबू अच्छेलाल -

अकोटचा दौरा आटोपून सकाळीच देवरी फाटा, चौहट्टा बाजारमार्गे ४७ किलोमीटरचा प्रवास करीत गांधीग्राम येथे पोहोचलो. अकोट-अकोला रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने खड्ड्यातून धुळीचा सामना करीत गांधीग्रामला पोहोचलो. तेथे ‘सकाळ’चे प्रतिनिधी संजय मांजरे व अकोला जिल्हा प्रतिनिधी मनोज भिवगडे प्रतीक्षेत होते. गांधीग्रामच्या सुप्रसिद्ध गुळपट्टीचा आनंद घेऊन स्थानिकांसोबत चर्चा केली. खारपाणपट्ट्याच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आले आणि केळीवेळी, दहिहांडा, म्हैसांगमार्गे खारपाणपट्ट्यातील बारा गावांचे ‘बारुला’ म्हणून ओळख असलेल्या परिसराच्या दौऱ्यावर निघालो. शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थांसोबतच या भागातील खारपाणपट्ट्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ज्ञांसोबत चर्चा करीत समोर आलेले वास्तव व उपाययोजनांबाबत माहिती घेतली.

बारुल्यातील आखतवाडा येथील सरपंच दिलीप मोहोड यांच्यासोबत परिसराचा फेरफटका मारला. ४३ अंश सेल्सिअसमध्ये डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकणाऱ्या महिला पाहिल्यानंतर येथील पाणीप्रश्न किती बिकट आहे, हे लक्षात आले. येथील शेती निसर्गाच्या भरोशावर पिकते. पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेले पीकपाणी, या तसेच अशाच अनेक अडचणींचा सामना करीत जगणारा शेतकरी घुंगशी-मुंगशी बॅरेजकडे डोळे लावून होता. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी पाइपलाइन टाकली जाईल म्हणून आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. ज्याच्या शेतात पूर्णा नदीच्या काठावरून सहज पाणी पोहोचू शकेल, त्यांच्याच शेताच्या बांधावर घुंगशी-मुंगशी बॅरेजचे पाणी पाइपलाइनने पोहोचविण्याचे काम सुरू असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. २०-२५ वर्षांपूर्वी काटेपूर्णा प्रकल्पातून सुलतानपूर मायनरने पाणी बारुल्यातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्याची योजना आखली होती. मात्र, ज्या गावाच्या नावाने ही मायनर बांधली तेथे आजही पाणी पोहोचलेले नाही. धोतर्डी, नावखेड, बहिर्खेडपर्यंत पोहोचलेले मायनरचे पाणी नंतर दिसलेच नाही.

छोटे छोटे बंधारे ठरू शकतात उपयोगी

खारपाणपट्ट्यात अनेक गावांतून छोटे-मोठे नाले वाहतात. त्यावर बांधलेले पूल डागडुजीअभावी मोडकळीस आले आहेत. गावात जाण्यासाठी नाल्यावर पूल बांधल्यास त्याचा फायदा गावकऱ्यांना होईल. बंधारा बांधल्याने थांबणाऱ्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सोय होते, हे आमदार रणधीर सावरकर यांनी आपोती-आपाताप्यासह बारुल्यातील काही गावातील नाल्यांवर बांधलेल्या बंधारा कम ब्रीजवरून दिसून आले. ही उपाययोजना खारपाणपट्ट्यात उपयोगी ठरणारी आहे. मात्र, येथील जमिनीत मुरुम नसल्याने बंधाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या पायव्याचा खर्च वाढतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बंधाऱ्यांची योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. खारपाणपट्ट्यात कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणावरच त्यांना अवलंबून रहावे लागते. बहुतांश वेळा पावसाळ्यात वेळेत पाऊस न आल्यास पीक हातातून जाण्याची वेळ येते. अशावेळी छोट्या-छोट्या बंधाऱ्यातून पाणी पोहोचविले तर शेतीसाठी फायद्याचे होऊ शकते.

जलयुक्तची कामे नावालाच

नाला खोलीकरण, नाला सरळीकरण करणे व त्यावर छोटे-छोटे बंधारे बांधण्याची शिफारस नाजाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत (पोक्रा) सर्वेक्षण करणाऱ्या समितीने दोन महिने खारपाणपट्ट्याचा अभ्यास केल्यानंतर केली होती. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. जलयुक्त शिवार योजनेतूनही ही कामे झालेली नाही. ही योजना केवळ नावालाच असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे आहे. त्याचा उपयोग काहींना झाला, तर काहींसाठी निरुपयोगी ठरले. कायमस्वरूपी सिंचनासाठी शेततळ्यांची अपुरी व्यवस्था असल्याने खारपाणपट्ट्यात त्याचा उपयोग होताना दिसत नाही.

‘पोक्रा’तून कोंबड्या-बकऱ्यांचे वाटप

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत (पोक्रा) शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. छोट्या-मोठ्या नाल्यांवर बंधारे बांधून ही व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी कोंबड्या-बकऱ्या वितरित करून आर्थिक समृद्धीचे स्वप्न शेतकरी व शेतमजुरांना दाखविले जात असल्याची खंत म्हैसांग, केळीवेळी, हिंगणी बु., दहिहांडा, गांधीग्राम, आगर, घुसर, आपातापा आदी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जो भाग गोड्या पाण्याच्या परिसरात येतो अशा कापशीसह पातूर तालुक्यातील काही भागात पोक्राचा समावेश करण्यात आला. खारपाणपट्ट्यासाठी असलेली ही योजना भरकटली आहे.

काय सांगतात आमदार...

मृदासंधारणाची कामे होणे गरजेचे

खारपाणपट्ट्यातील जमीन काळी कसदार आहे. हजारो वर्षांपासून जमिनीची धूप होत आहे. शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी मृदासंधारणाची कामे व्हावी. या भागातील जमिनीचा पोत सुधारला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. खारपाणपट्ट्यासाठी काही वर्षांपूर्वी वसुधाताई देशमुख यांच्या नेतृत्वातील समितीने काही सुधारणा सूचविल्या होत्या. त्यानंतर पोक्रांतर्गत मी स्वतः ज्या समितीत होतो, त्याच्या शिफारशीही लागू केलेल्या नाहीत. आता पोक्रातील निधी खर्च कसा करायचा, यावर भर दिला जात आहे. बंधाऱ्याचे पर्याय खर्चिक असून, पायव्याच्या अडचणीमुळे ते तत्काळ मार्गी लागावे.

-आमदार रणधीर सावरकर

छोटे छोटे बंधारे उपयुक्त

खारपाणपट्ट्यातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. सिंचनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शिफारस पोक्रातून केली होती. दोन महिने खारपाणपट्ट्यात मुक्काम करून समितीने अहवाल तयार करून अनेक शिफारशी केल्या होत्या. त्याची अंंमलबजावणी होताना दिसत नाही. मुरमाड जमिनीत पाणी साठवले तर ते मोठ्या प्रमाणात जमिनीत झिरपते. मात्र खारपाणपट्ट्यात पाणी साठवल्यानंतर ते एप्रिल-मेपर्यंत टिकते. त्यामुळे या भागात छोटे-छोटे बंधारे उपयुक्त आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हा प्रयोग लोणार नदीवर केला होता. मात्र, येथे पाणी अडविण्याची सोय नाही.

- दिलीप मोहोड, सरपंच, गट ग्रामपंचायत, आखतवाडा

एक-दीड वर्षात काम पूर्ण

खारपाणपट्ट्यातील शेतीसाठी टाइम बाउंड कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतीत कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. काही भागात तूर-सोयाबीन पॅटर्न उपयोगी आहे; पण काही भागात तो लागू होत नाही. शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब थोरात, वसुधाताई देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून बॅरेजचे काम मार्गी लावले होते. मंगरूळ कांबे, नेरधामणा येथेही बंधारे होत आहेत. घुंगशीतून म्हैसांग परिसरात पाइपलाइनने पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दीड वर्षात काम पूर्ण होईल.

- हेमंत देशमुख, सधन शेतकरी, म्हैसांग

बांध बंधिस्तीची कामे राबवावी

खारपाणपट्ट्यातील शेती काळी, कसदार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटते. हंगामी सिंचनाची व्यवस्था झाली, एक-दोन पाणी देण्याची सुविधा मिळाली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. बांध व शेततळे त्यासाठी उपयोगी पडतील. या भागात बारमाही सिंचन शक्य नाही. काळी माती वाहून जाऊ नये म्हणून बांध बंधिस्तीची कामे प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. पूर्णा नदीच्या परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतः शेतापर्यंत पाणी आणले. त्याचा त्यांना फायदा होत आहे.

- गोपाल दातकर, सधन शेतकरी तथा उपजिल्हा प्रमुख शिवसेना, हिंगणी बु.

१५ दिवसांतून एकदा पाणी

खारपाणपट्टयात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कशा बळकट होतील आणि नागरिकांना दररोज गरजेपुरते पाणी कसे मिळू शकेल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या १५ दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

- पप्पू पाटील, अकोला

तज्ज्ञ काय सांगतात...

जमिनीची धूप थांबविणे हाच पर्याय

खारपाणपट्ट्यातील जमिनीत मनमोरोलाईट नावाचे खनिज आढळते. ७०-८० फुटांवरून वाहत आलेली काळी माती पूर्णा नदीच्या दुतर्फा अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ५० हजार हेक्टरवर पसरल्याने सुपीक जमीन तयार झाली. या जमिनीतील क्षार कायमस्वरूपी काढता येणार नाही. तसे करणे म्हणजे समुद्राला क्षारमुक्त करणे होईल. ते शक्य नाही. या भागातील जमिनीची धूप थांबविणे हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मूलस्थानी मृद व जलसंधारणाचे उपचार करावे लागतील. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन व बदलत्या हवामानानुसार शेतीच्या मशागत पद्धतीत बदल करून जमिनीची धूप थांबविता येते. वाहून जाणाऱ्या पाण्याला अडविले पाहिजे. त्यामुळे मृत झालेले नदी-नाले जिवंत होतील.

- डॉ. सुभाष टाले, निवृत्त शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

दृष्टिक्षेपात -

खारपाणपट्ट्याचे क्षेत्र : अमरावती, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदी काठावरील ४.५ लाख हेक्टर जमीन

अकोला जिल्ह्यातील व्याप्त तालुके: मूर्तिजापूर, अकोला, अकोट, तेल्हारा व बाळापूरचा काही भाग

जिल्हानिहाय खारपाणपट्ट्याचे क्षेत्र (अंदाजे) :

  • अमरावती : एक लाख ६० हजार हेक्टर

  • अकोला : एक लाख ७२ हजार हेक्टर

  • बुलडाणा : एक लाख एक हजार हेक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com