अमरावती बाजार समिती होतेय "हायटेक'

File photo
File photo

अमरावती : जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल राज्यात वा परराज्यात कुठेही विकू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, नेहमीच्याच बाजार समितीत यावे लागेल. गुणवत्ता तपासणी झाली की तो ऑनलाइन विक्री करू शकेल. तत्काळ पैसाही त्याच्या बॅंकखात्यात जमा होईल. हे स्वप्न नाही, तर सहज शक्‍य होणार आहे ई-नाम पोर्टलने.
राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाना, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात व उत्तर प्रदेशात ई-नाम पोर्टल सुरू आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातही ही योजना लागू करण्यात आली. राज्यातील 60 बाजार समित्या यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील अमरावतीसह अंजनगावसुर्जी, दर्यापूर व अचलपूर या समित्यांची त्यासाठी निवड झाली. ई-नाम योजनेत सामील जिल्ह्यातील किंबहुना पश्‍चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अमरावती बाजार समितीमधील 6,500 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हंगामात या बाजार समितीत दररोज 40 ते 60 हजार पोत्यांची आवक होते. कृषी पणन मंडळाने गुणवत्ता व प्रततपासणीसाठी असेसिंग लॅबचे साहित्य पाठविले; त्याचप्रमाणे वायफाय लावण्यासाठी बीएसएनएलसोबत करार करून 5 लाख 57 हजार रुपये निधीदेखील दिला. 26 एकर परिसरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
काय आहे ई-नाम?
शेतकऱ्याने शेतमाल आणताच त्याची ई गेट एंट्री नोंद होईल. गुणवत्ता तपासल्यावर लॉट लावले जातील. ई-नाम पोर्टलवर नोंदणीकृत देशभरातील अडते व खरेदीदार लिलावात भाग घेतील. भाव ठरताच शेतकऱ्यांच्या पैशासह अडत्यांची दलाली, बाजार समितीची सुपरव्हिजन फी तातडीने त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. हा सर्व व्यवहार ऑनलाइन होणार आहे. शेतकऱ्यांना तो त्यांच्या स्मार्ट फोनमध्ये बघता येणार आहे. आर्थिक व्यवहारासाठी आयसीआयसीआय व ऍक्‍सिस बॅंकांसोबत करार झाला. ई गेटमध्ये आतापर्यंत अमरावती बाजार समितीमधील 246 खरेदीदार व 310 अडत्यांची नोंदणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com