नदी टिटवी'च्या विणीची अमरावतीत प्रथमच नोंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

संकटग्रस्त असलेल्या "नदी टिटवी' या दुर्मीळ प्रजातीतील पक्ष्याचे प्रजनन वा विणीची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेने (वेक्‍स) राज्यात प्रथमच नोंद केली; त्यामुळे वेक्‍सच्या पक्षी अभ्यासकांना तब्बल पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश आले.

अमरावती ः संकटग्रस्त असलेल्या "नदी टिटवी' या दुर्मीळ प्रजातीतील पक्ष्याचे प्रजनन वा विणीची वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेने (वेक्‍स) राज्यात प्रथमच नोंद केली; त्यामुळे वेक्‍सच्या पक्षी अभ्यासकांना तब्बल पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर यश आले.
वेक्‍सचे पक्षी अभ्यासक गत पाच वर्षांपासून विदर्भाच्या विविध भागांतील नद्यांमधून या प्रजातीचा शोध व अभ्यास करीत होते. मेळघाटातील तापी, सिपना, मध्य प्रदेशातील पेंच, चंद्रपूर व गडचिरोली भागातील वैनगंगा, अप्परवर्धा तथा तोतलाडोह आदी जलाशयांच्या ठिकाणी या पक्ष्याचे अस्तित्व आढळले. दरम्यान, यंदा वेक्‍सच्या चमूला मेळघाटातील तापी नदीत या पक्ष्याच्या प्रजननाची नोंद घेण्यात यश आले. संस्थेचे पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. गजानन वाघ व डॉ. जयंत वडतकर यांनी धारणी ते बैरागड भागात एकूण 12 पक्षी व तीन घरटी शोधून काढली. हयात कुरेशी, निखिल बोरोडे व पंकज भिलावेकर या मेळघाटातील बांधवांचे सहकार्य वेक्‍सच्या अभ्यासकांना लाभले. घरटे व विणीच्या या नोंदीमुळे नदी टिटवीच्या विणीची राज्यात पहिलीच नोंद असल्याची माहिती वेक्‍सचे डॉ. गजानन वाघ यांनी दिली. या नोंदीवर बीएनएचएसचे डॉ. राजू कसंबे यांनी त्याला पुष्टी दिली. नद्या सुरक्षित राहिल्या तर या संकटग्रस्त पक्ष्याचे अस्तित्व टिकून राहील, असे मत पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केले.
गत चार वर्षांपासून वेक्‍सचे किरण मोरे, नंदकिशोर दुधे, अल्केश ठाकरे, गौरव कडू, मनीष ढाकुलकर, निनाद अभंग, सौरभ जवंजाळ, प्रथमेश तिवारी व जगदेव इवाने या पक्षी अभ्यासकांनी वेळोवेळी निरीक्षणात सहभाग घेतल्याचे डॉ. वडतकर यांनी सांगितले.
मार्च ते एप्रिल प्रजनन काळ
"नदी टिटवी' हा पक्षी आपल्या भागात आढळणाऱ्या लाल गालाच्या टिटवीपेक्षा आकाराने किंचित लहान, 31 सें.मी. लांब, चेहरा संपूर्ण काळा व डोक्‍यावर काळी शेंडी राहते. छातीवर राखडी रंगाचा पट्टा असून पोट पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे असते. पाय, चोच व शेपटीचे टोक काळ्या रंगाचे असून पंख मातकट रंगांत राहतात. या पक्ष्याचे इंग्रजी नाव "रिव्हर लॅपविंग'; तर "वेनिलस डुवाऊसेली' अशी त्याची शास्त्रीय ओळख आहे. मार्च ते एप्रिल हा प्रजननाचा कालावधी आहे. लाल गालाची टिटवी, पिवळ्या गालाची टिटवी, राखी डोक्‍याची टिटवी व नदी टिटवी अशा एकूण 4 प्रजाती आपल्या भागात आढळत असल्याचे डॉ. वडतकर म्हणाले.

Web Title: Amravati bird news