अमरावती ः सभागृहात श्री. ताजणे यांचा पाठलाग करताना कार्यकर्ते.
अमरावती ः सभागृहात श्री. ताजणे यांचा पाठलाग करताना कार्यकर्ते.

अमरावती : बसप प्रदेश प्रभारीचे फाडले कपडे

अमरावती : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदारसंघातून मिळालेली मते आणि त्यातून झालेल्या पक्षाच्या मानहाणीचे खापर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्रभारींवर फोडले. आढावा बैठक घेण्यासाठी आलेले प्रदेश प्रभारी संदीप ताजणे यांच्यावर कार्यकर्त्यांनी खुर्च्या भिरकावल्या. त्यानंतर त्यांचे कपडे फाडले. अखेर त्यांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. स्थानिक पदाधिकाऱ्यांपैकीच काहींनी असा प्रकार करण्यास उचकवून दिल्याची चर्चाही बैठकीनंतर सुरू होती.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा फारच कमी मते मिळाल्याने त्यांचा अपमानजनक पराभव झाला. याबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आज, सोमवारी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला अमरावती शहरासह ग्रामीण भागातून बसपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. बैठकीला महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी संदीप जैन, महासचिव प्रमोद रैना, प्रदेश महासचिव राजीव बसवनाथे, जिल्हाध्यक्ष आनंद लांजेवार यांच्यासह अन्य व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक होते. ताजणे यांनी विरोधी पक्षाकडून पैसे घेतले, जिल्ह्यात दौरा केला नाही, निवडणुकीच्या काळात पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दौरे केले नाहीत. त्यामुळे बसपच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने कामे करावी याबाबत दिशा मिळाली नाही. त्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला, असा आरोप करून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. कार्यकर्त्यांची समजूत काढणे कठीण असल्याचे बघून महासचिव प्रमोद रैना यांना काही कार्यकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. पोलिस पोहोचण्यापूर्वीच संदीप ताजणे यांना संतप्त पदाधिकाऱ्यांनी घेरून जबर मारहाण केली. त्यांचा शर्ट फाडला. पोलिस आल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवून एका खोलीत बसविले. फ्रेजरपुरा पोलिसांच्या जीपमध्ये ज्यावेळी ताजनेंना नेण्यात आले, तेव्हा ताजने यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
लोकसभेसाठी उमेदवार लादला नव्हता
लोकसभा निवडणुकीसाठी येथे बसप उमेदवार दिला नव्हता. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या संमतीने उमेदवारीचा निर्णय झाला होता. दुसऱ्या कुण्याही उमेदवाराकडून पैसे घेण्याचा प्रश्‍नच नाही. ज्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, कपडे फाडले ते पक्षाचे कार्यकर्ते असल्याने गैरसमजातून ही घटना घडली. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करणार नाही, असे संदीप ताजणे म्हणाले.
दुसरा शर्ट आणेपर्यंत एकाच खोलीत
पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर ताजणे यांना एका खोलीत नेले. त्यांच्यासाठी दुसरा शर्ट आणेपर्यंत त्यांना पाऊण तास पोलिसांच्या गराड्यात खोलीतच राहावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com