सायबर पोलिसांनी वाचविले खातेदाराचे 57 हजार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

अमरावती : सायबर पोलिसांनी तक्रारकर्त्याच्या माहितीवरून तत्काळ फायनान्स कंपन्यांशी संपर्क साधल्यामुळे तोतयाने एका व्यक्तीचे हडपलेले 57 हजार रुपये त्याला परत मिळाले. मनीष गुणवंत शेळके (रा. चौबळ प्लॉट, अमरावती) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अमरावती : सायबर पोलिसांनी तक्रारकर्त्याच्या माहितीवरून तत्काळ फायनान्स कंपन्यांशी संपर्क साधल्यामुळे तोतयाने एका व्यक्तीचे हडपलेले 57 हजार रुपये त्याला परत मिळाले. मनीष गुणवंत शेळके (रा. चौबळ प्लॉट, अमरावती) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मनीष शेळके यांना सोमवारी (ता. नऊ) सकाळी अकराच्या सुमारास 07547886189 या क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने बजाज फायनान्स कंपनीमधून बोलत असल्याचे शेळके यांना सांगितले. संपर्क साधणाऱ्या तोतयाने शेळके यांचे पूर्ण नाव, पत्ता यासह इतर वैयक्तिक माहिती विचारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन खाते सुरू करून देतो, अशी बतावणी केली. सोमवार हा शेवटचा दिवस असल्याची माहिती तोतयाने शेळके यांना दिली. शिवाय जो ओटीपी क्रमांक येईल, तो आपल्याला सांगा. त्यानंतर बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येईल, असे संपर्क साधणाऱ्याने शेळके यांना सांगितले. तोतयाला ओटीपी क्रमांक देताच शेळके यांच्या बजाज फायनान्स कंपनीच्या खात्यामधून 57 हजार 480 रुपयांची फ्लिप कार्डवरून ऑनलाइन खरेदी केली. शेळके यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 10) तोतयाविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. सायबरचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी फ्लिप कार्डशी संपर्क साधून जे सामान तोतयाने शेळके यांच्या बॅंकखात्यातील रकमेतून खरेदी केले होते, त्याची डिलेव्हरी थांबविण्याबाबत कळविले. बजाज फायनान्स कंपनीशी संपर्क साधून मनीष शेळके यांच्या खात्यातून वळती केलेली रक्कम त्यांना परत करण्यास सांगून जो व्यवहार तोतयाने केला तो रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तक्रारकर्त्यास दिलासा मिळाला.

Web Title: Amravati cyber crime news