विहिरीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी (ता. 20) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अत्यवस्थ दोघांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावती : भातकुली तालुक्‍यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी (ता. 20) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अत्यवस्थ दोघांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओंकार अवधूत वानखडे (वय 42) व अविनाश दिगंबर बिजवे (वय 35; दोघेही रा. गणोजादेवी) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दीनानाथ विठ्ठल बिजवे (वय 30) व राजू मारोतराव खेडकर (वय 35; रा. गणोजादेवी) हे दोघे अत्यवस्थ आहेत.
गणोजादेवी या गावातील विनायक बिजवे यांच्या घरातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सकाळी दहापासून सुरू होते. त्या कामाला चार मजूर लावण्यात आले होते. दुपारी दीडपर्यंत गाळ काढून झाला; मात्र त्यानंतरही आत असलेली मोटार लावूनही पाणी येत नव्हते. त्यामुळे पुन्हा चौघे विहिरीत उतरले. मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यातून धूर निघू लागला. विनायक बिजवे यांच्या घराच्या आवारातील ही विहीर अरुंद असून चाळीस फूट खोल आहे. मोटारपंपाचा धूर जास्त प्रमाणात साचल्यामुळे आत काम करणाऱ्या चौघांची प्रकृती बिघडली. वर असलेल्या लोकांनी या चौघांना दोराने बांधून विहिरीबाहेर काढले. त्यांना प्रथम भातकुली येथील एका खासगी रुगणालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच ओंकार वानखडे व अविनाश बिजवे या दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले. अत्यवस्थ दीनानाथ बिजवे व राजू खेडकर यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
शनिवारी शवविच्छेदन
अचानक घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईक तथा ग्रामस्थ घाबरलेत. श्‍वास गुदमरल्यामुळे मृत्यू पावलेल्या दोघांचे शवविच्छेदन शनिवारी (ता. 21) करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला, असे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले.

 

Web Title: amravati labour death news

टॅग्स