अमरावती : असे काय झाले की, नागरिकांनी नवरोबाला चपलेने बदडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- दुसऱ्याच्या पत्नीसोबत लग्न 
- पहिली पत्नी नागरिकांसोबत फ्रेजरपुरा ठाण्यावर 
- त्यांच्या लग्नाचा भंडाफोड
- दोघांना पोलिस ठाण्यात आणले 
- पोलिसांनी केला समजूत घालण्याचा प्रयत्न 

अमरावती : दोन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीचे शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत सूत जुळले. अन्य शहरात जाऊन लग्नही उरकले. आज ते दोघेही अमरावती दाखल होताच, त्याचा मेहुणा, पत्नी आणि काही नागरिकांनी त्याला चपलांनी बदडून काढले. सोमवारी (ता. 18) दुपारी एकच्या सुमारास शहरात ही घटना घडली. 

मुलांना वाऱ्यावर सोडले 
दोघेही विवाहित, त्याला दोन मुले अन्‌ तिलाही दोन मुली असे सर्व सुरळीत सुरू असताना, एक महिन्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे शेजारच्या विवाहितेसोबत सूत जुळले. त्यानंतर विवाहित जोडप्यांचे प्रेम बहरले. दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचे त्याच्या पहिल्या पत्नीला समजले. परंतु त्यांना हवा असलेला एकांत येथे मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलांना वाऱ्यावर सोडून पळ काढला.

Image may contain: 1 person

लॉजवर उरकले लग्न 
बाहेरगावी एका लॉजवर ते महिनाभरापासून राहत होते. एवढेच नव्हे तर त्यांनी तेथेच लग्नही उरकले. हा प्रकार त्याच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या पतीला माहिती झाला. त्या दोघांनी काही दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पहिले लग्न झाले असताना, दुसरीसोबत विवाह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

मुलांना भेटण्यासाठी ते दोघे शाळेत पोहोचले 
तिच्या मुली आणि त्याची मुले अमरावती येथील शाळेत शिकतात. अखेर त्यांना आपल्या मुलामुलींची आठवण झाली. त्यामुळे ते अमरावतीत पोहोचले. मुलांना भेटण्यासाठी ते त्यांच्या शाळेत गेले. हा प्रकार त्याच्या मेहुण्याच्या दृष्टीस पडला. मेहुणा आपली बहीण व तिच्या पतीसह मोतीनगर येथील त्या शाळेत पोहोचला. 

 

Image may contain: one or more people, people standing, flower and outdoor

नागरिकांनी चपलेने बदडले 
पत्नीने व मेहुण्याने दोन मुलांचा पिता असलेल्याची चांगलीच पिटाई केली. पत्नीने त्याला चपलेने बदडून काढले. हा प्रकार बघून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. त्यांनीही त्याला चोपले. पोलिसांना घटनेची माहिती देऊन ठाण्यात त्या दोघांना सोबत घेऊन लोक पोहोचले. अखेर त्यांच्या लग्नाचा भंडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

समजूत काढण्याचा प्रयत्न 
विवाहित असताना दुसरा विवाह करून स्वत:चा सुरळीत सुरू असलेला संसार उद्‌ध्वस्त करणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिने पतीसोबत, तर त्याने पत्नीसोबत पुन्हा सुखाने संसार करावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला. 
- पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati marriage matter reach to police staion