स्त्रीचा सन्मान करणारे देश प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

अमरावती : समाज घडविण्याची ताकद स्त्रियांमध्येच आहे. ज्या देशांनी स्त्रीचा सन्मान केला ते देश जगात प्रगतिपथावर आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा सवाई यांनी केले. बडनेरा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ उद्यापासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवासी स्वयंसेवक शिबिर होत आहे. त्याच्या पूर्व आयोजित मातृसंमेलनात त्या बोलत होत्या.

गुरुवारी (ता. 17) दुपारी चार वाजता मातृसंमेलनाचे उद्‌घाटन पौर्णिमा सवाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुधा देशमुख, प्रांत संघचालक श्रीराम हरकरे, अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख मंगेश भोंडे, राष्ट्रसेविका समितीच्या भाग्यश्री साठे उपस्थित होत्या. पौर्णिमा सवाई यांनी या वेळी स्त्रीजीवनाची उकल केली. त्यांनी ग्रामगीतेतील स्त्रीचे महत्त्व आणि तिचे जगणे, तिची काल, आज- उद्याची परिस्थिती यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जगात भारताची संस्कृती सर्वांत चांगली आहे. त्यामुळे मुलामुलींवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आईची आहे. सुंदर देह भगवंताने आपणास दिला, सुंदर जीवन जगा. चमत्कारी संतांच्या भाकडकथा वाचण्याऐवजी ग्रामगीता महिलांनी वाचावी. पशुपक्षी, कीटक, प्राणी एकत्र येऊ शकतात, त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यास आपणही एकत्र येणे गरजेचे आहे. राष्ट्रसंतांनी जगात माणूस शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना शेवटपर्यंत माणूस सापडला नाही. समाजातली माणुसकी संपत चालली आहे. समाज घडविण्याची जबाबदारी ही मातेचीच असून त्यासाठी चांगले संस्कारित मुले घडविण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला. प्रत्येकीने आई-वडील, सासू-सासरे यांची सेवा केली पाहिजे. ज्या घरात आई-वडील नाहीत, ते घरच नाही, असेही त्या या वेळी म्हणाल्या.
सरसंघचालक आजपासून मुक्कामी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारपासून (ता. 18) अमरावतीत शिबिरस्थळीच मुक्काम करतील. सायंकाळी पाच वाजता त्यांचे आगमन होणार आहे. यानिमित्ताने परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. 20 जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.

Web Title: amravati matrusammelan news