सुनेने दिला सासूच्या पार्थिवाला मुखाग्नी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः हिंदू धर्मात अंत्यसंस्कार घरातील पुरुषाने करण्याची प्रथा आहे. मात्र तालुक्‍यातील तळेगाव दशासर येथील एका सुनेने आपल्या सासूच्या पार्थिवाला मुखाग्नी देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः हिंदू धर्मात अंत्यसंस्कार घरातील पुरुषाने करण्याची प्रथा आहे. मात्र तालुक्‍यातील तळेगाव दशासर येथील एका सुनेने आपल्या सासूच्या पार्थिवाला मुखाग्नी देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.
तळेगाव दशासर येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या आदर्श ग्राम कृती समितीचे विजय माथने यांच्या मातोश्री शीला माथने यांचे निधन झाले. निधनापूर्वी त्या मोठ्या बहिणीकडे होत्या. त्यामुळे विजय माथने यांच्या पत्नी जयश्री यांना सासूची सेवाशुश्रूषा करण्याची संधी मिळू शकली नाही. विजय माथने यांनी त्यांच्या संपूर्ण नातेवाइकांकडे आपल्या आईच्या देहदानाचा प्रस्ताव मांडला; पण तो सर्वांनी नाकारला. शेवटच्या इच्छेनुसार आईचे पार्थिव मूळ तळेगाव दशासर येथे आणले गेले व अग्निसंस्काराची वेळ ठरली. त्याप्रमाणे तयारी देखील सुरू झाली. दरम्यान, पत्नीच्या हातून आईची शुश्रूषा होऊ शकली नाही; म्हणून सर्व अग्निसंस्कार पत्नीने करावे अशी विजय माथने यांची इच्छा होती. त्यासाठी हेमंत टाले, रवी मानव, मनोहर साबळे, पारिसे, बागडे यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी होकार दिल्यानंतर लगेच जयश्री यांनी सासूच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. शेवटची पाण्याची घागरसुद्धा त्यांनीच फिरविली. दुसऱ्या दिवशीसुद्धा जयश्री माथने यांनी रक्षा विसर्जन करण्याकरिता थेट स्मशान गाठले व स्वतः ती गोळा केली.
सर्व सेवा मंडळांच्या सहकार्याने गावातीलच कार्यकर्त्यांच्या शेतात रक्षा विसर्जित केली गेली. लगेचच गुरुकुंज मोझरी येथे आश्रमात अस्थिकलश घेऊन तो तेथील कुंडात विसर्जित करण्यात आला. आईची तेरवी न करता तोच पैसा या वर्षात होणाऱ्या श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराकरिता खर्चण्याचा संकल्प विजय माथने यांनी केला. तर श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: Amravati news

टॅग्स