अमरावतीत दोन समुदायांमध्ये तणाव

File photo
File photo

अमरावती : ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यातील वादातून घेतलेल्या कथित बहिष्काराच्या निर्णयाचा मुद्दा शहरात चांगलाच पेटला असून, मराठा विरुद्ध सिंधी समुदाय असा संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान, बहिष्काराचा निर्णय ही सोशल मीडियावरील अफवा असल्याचे सिंधी समाजाने स्पष्ट केले आहे. सिंधी समुदायाचे जमिनीचे पट्टे परत घ्यावेत आणि तसेच शहरातील पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठवावे, अशी मागणी मराठा समाजातर्फे शुक्रवारी (ता. तीन) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मराठा समाजाने पोलिस आयुक्तालयावरसुद्धा धडक दिली. मराठा समाजातील व्यावसायिक संघटना, जिजाऊ ब्रिगेड, लष्कर कृषक संघ व मॉं जिजाऊ महिला प्रतिष्ठानाचे शेकडो पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.
शहरातील हॉटेल रंगोली पर्लमध्ये मंगळवारी (ता. 31) झालेल्या एका समारंभादरम्यान वाद झाला. या प्रकरणात पोलिसांनी "रंगोली पर्ल'च्या संचालकांसह सिंधी समाजाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल केले होते. या घटनेत सध्याच्या तणावाचे मूळ आहे. पोलिस आयुक्तांशी बोलताना मराठा समाजाने असा दावा केला की, या घटनेनंतर सिंधी समाजाने आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून हॉटेल व्यावसायिक नितीन देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिसांवर दबाव टाकला. तसेच हॉटेल रंगोली पर्लवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सिंधी समुदायाला सरकारतर्फे देण्यात आलेले निवासी व व्यावसायिक जागांचे लीजपट्टे तातडीने रद्द करून ती जमीन सरकारने ताब्यात घ्यावी व गोरगरिबांना द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांच्याकडे केली. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांना दिलेल्या निवेदनातूनसुद्धा याच मागण्या केल्या. यावेळी मयूरा देशमुख, हरिभाऊ मोहोड, नितीन देशमुख, नितीन मोहोड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
"बहिष्कार' ही अफवाच!
सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या कथित बहिष्काराला काही माध्यमांनी प्रसिद्धी दिली. आम्ही कोणत्याही हॉटेल, समाज किंवा कोणत्याही प्रकारचा बहिष्काराचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा अपप्रचार करणाऱ्यांचा आमची पंचायत विरोध करते. पंचायतचे काम आपापसात बंधुत्व निर्माण करण्याचे आहे. द्वेष पसरविण्याचे काम पंचायत करीत नाही. आमच्या पंचायतीने मराठा बांधवांना व इतर समाजांना प्रत्येकवेळी साथ दिली आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारची अफवा पसरवणाऱ्यांशी पंचायतचा कोणताच संबंध नसल्याचे पूज्य कंवरराम नगर पंचायतचे अध्यक्ष ऍड. व्ही. एल. नवलानी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com