फवारणीमुळे चार महिन्यांत 19 जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी जुलैत रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसून आली. योग्य उपचारामुळे त्या सर्वांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी जुलैत रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसून आली. योग्य उपचारामुळे त्या सर्वांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले.
जिल्ह्यात उपरोक्त चार महिन्यांत कीटकनाशक प्राशन करणाऱ्या व्यक्तींची संख्या 384, तर कीटकनाशक फवारणीमुळे एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी एक आणि जुलैत 16 अशा एकूण 19 व्यक्तींना बाधा झाली. पैकी 18 व्यक्ती उपचाराअंती पूर्णतः बऱ्या झालेल्या आहेत. एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. फवारणीमुळे या वर्षी आतापर्यंत एकही व्यक्ती दगावलेली नाही, ही सर्वांत समाधानाची बाब मानली जात असली, तरी फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या घटनेत गत तीन महिन्यांच्या तुलनेत जुलैत वाढ झालेली आहे. याउलट एप्रिल 85, मे 139, जून 50, जुलै 110 अशा एकूण 384 व्यक्तींनी विष प्राशन केले. पैकी एप्रिल 81, मे 131, जून 45, जुलै 103 व्यक्ती उपचाराअंती पूर्णतः बऱ्या झाल्या, तर 8 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांत एप्रिल, मे, जूनमध्ये प्रत्येकी 1, तर जुलैत 5 व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले.
गत वर्षी कपाशीवरील फवारणीमुळे अनेकांना विषबाधा झाली होती. विभागात सुमारे 22 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक 18 व्यक्तींचा त्यात समावेश होता. अमरावती जिल्ह्यात फवारणीमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून फवारणीसाठी आवश्‍यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. सद्य:स्थितीत पावसाअभावी शेतीपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने ग्रामीण भागात फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.

Web Title: amravati news