साद्राबाडीत भूकंप नाही!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

अमरावती : धारणी तालुक्‍यातील साद्राबाडी व परिसरात जमिनीतून ऐकू येत असलेला प्रकार हा भूकंप वा भूकंपाचा प्रकार नाही, असा प्राथमिक निष्कर्ष जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (जीएसआय) चमूने काढला; तर नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ चमूतर्फे (एनसीएस) शनिवारपासून (ता.25) सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.

जीएसआय पथकातील भूवैज्ञानिक श्री. प्रसाद, संजय वानखडे यांनी साद्राबाडी व झिल्पी या दोन गावांना शुक्रवारी भेट देत या परिसराचा अभ्यास केला; पाण्याची पातळी मोजली; ओढे, नाले आदींचे सर्वेक्षण केले; जमीन व खडकाच्या प्रकाराची माहिती घेतली. यातून भूकंपाचा आवाज होत नसून भूकंपात जमीन एका दिशेकडून दुसरीकडे थरारत जाते, तसा कोणताही प्रकार या ठिकाणी नसल्याचा पर्यायाने हा भूकंप नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष चमूने काढला. तथापि, त्यांचा अधिकृत अहवाल अद्याप अप्राप्त असल्याचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी सांगितले. संबंधित चमू जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झाली. पाण्यात ऑक्‍सिजन असते. भेगांमधून ते जमिनीत खोलपर्यंत झिरपल्याने त्यातून निर्माण होणारा वायू बाहेर येतो. या चमूतर्फे सोमवारपासून विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने पुन्हा तपासणी केली जाईल, असेही गांजरे यांनी सांगितले.
दरम्यान, एनसीएसचे तज्ज्ञ कुलबीर सिंह आणि बबन सिंह हे धारणी येथे शुक्रवारी दुपारी दाखल झालेत. त्यांच्याकडून शनिवारी (ता.25) सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.

Web Title: amravati news