सोयाबीन खरेदीत शासनाची गोची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अमरावती : खुल्या बाजारात मिळत असलेला भाव, नगदी चुकारे व आणखी भाव वाढण्याची अपेक्षा, यामुळे यंदा शेतकऱ्यांनी शासनाला सोयाबीन विकले नाही. बारांपैकी सहा केंद्रांवर तर शेतकरी फिरकलाही नाही. खरेदीची मुदत संपली त्यावेळी अमरावती जिल्ह्यात शासनाला एक हजार 409 क्विंटल सोयाबीन मिळाले. 10 हजारांवर नोंदणी असताना 103 शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र गाठल्याने सोयाबीन खरेदीत शासनाची चांगलीच गोची झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरिपात 2 लाख 91 हजार 642 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होती. एकूण पेरणीक्षेत्राच्या ती 82 टक्के इतकी आहे. सोयाबीन उत्पादक पट्ट्यातच उत्पादनाची सरासरी घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली. अशातच चीनच्या बाजारपेठेचे द्वार उघडल्याने भारतीय सोयाबीनला मागणी चांगलीच वाढली. त्याचा एकूणच परिणाम भाव वाढण्यात झाला. शासनाने 3,399 रुपये हमीदर जाहीर केला असताना शंभर ते दीडशे रुपये कमी दर खुल्या बाजारात मिळू लागला. चुकारे नगदी असल्याने साहजिकच शेतकऱ्यांचे पावले खुल्या बाजाराकडे वळली.
शासनाने ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात शासकीय खरेदी सुरू केली. मात्र, यंदा या केंद्राच्या नशिबी शेतकरी येण्याची प्रतीक्षाच आली. अमरावती जिल्ह्यात अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूररेल्वे, अंजनगावसुर्जी, नांदगाव खंडेश्‍वर ही केंद्र जिल्हा मार्केटिंगच्या तर, मोर्शी, वरुड, धामणगावरेल्वे, अमरावती व चांदूरबाजार ही विदर्भ मार्केटिंगच्या अखत्यारीतील केंद्र होती. या सर्व केंद्रांवर दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली. मात्र, प्रत्यक्षात 103 शेतकऱ्यांनीच या केंद्रांवर सोयाबीन विकले. यामध्ये अचलपूर चार, तिवसा आठ, चांदूररेल्वे 26, नांदगाव खंडेश्‍वर सहा, धामणगावरेल्वे 41, अमरावती 18 अशा 59 शेतकऱ्यांनी या केंद्रावर विक्री केली. उर्वरित केंद्रांवर शेतकरी फिरकलेदेखील नाही. शासनाचे निकष, नियम व चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा यापेक्षा शेतकऱ्यांनी कोणत्याही निकषाशिवाय नगदी चुकारे मिळणाऱ्या खुल्या बाजारास पसंती दिली.

Web Title: amravati news