साखर कारखान्यांना अखेरची घरघर

File photo
File photo

अमरावती : पुरेसे पाणी व सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने विदर्भातील साखर उद्योग बुडण्याच्या स्थितीत आला आहे. गेल्या दोन दशकांपूर्वी या भागात आलेल्या चौदा कारखान्यांपैकी यंदा केवळ चारचीच धुरांडे पेटू शकलीत.
गेल्या महिनाभरात या कारखान्यांनी 1 लाख 74 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 लाख 61 हजार क्‍विंटल साखर उत्पादित केली. दरवर्षी विदर्भातील उसाचे पेरणीक्षेत्र घटत असून कारखान्यांना घरघर लागत आहे.
विदर्भात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या धर्तीवर या भागातील सहकार नेत्यांनी साखर कारखाने उभारण्याची चळवळ उभारली. त्यातून चौदा कारखाने पूर्व व पश्‍चिम विदर्भात उभे झालेत. त्यातील बहुतांश तर कागदावरच उभे झालेत. सद्य:स्थितीत कागदावर चौदा काखान्यांची नोंद असलेल्या विदर्भात दोन वर्षांपूर्वी सात कारखाने सुरू होते. त्यातही सहा खासगी होते. यंदा केवळ चारचीच धुरांडे पेटू शकलीत. 15 नोव्हेंबरपासून गाळप सुरू झाले आहे. विदर्भात एका हंगामात सुमारे 8.50 ते 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होते. उपलब्धता मात्र 7 ते साडेसात लाख टनापर्यंतच आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 हजार हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड आहे. यामध्ये नागपूर विभागात 10 हजार 158, तर अमरावती विभागात 9 हजार 747 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यंदा प्रत्यक्षात नागपूर विभागात 2 हजार 283 व अमरावती विभागात 4 हजार 490 हेक्‍टर क्षेत्रातच पेरणी झाली.
दोन दशकांपूर्वी या भागात वीस कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. कालांतराने ते आजारी किंवा बंद पडलेत. काहींना तर एका गाळपानंतरच टाळे लागलेत. 17 सहकारी कारखान्यांपैकी 11 खासगी उद्योजकांना विकले गेले. उर्वरित सहापैकी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारीमधील गाळप दोन वर्षांपासून बंद आहे. त्याच्या पुनरुज्जीवनाची शक्‍यता जवळपास मावळली आहे.सध्या विदर्भात अमरावती विभागातील यवतमाळमधील सुधाकरराव नाईक नॅचरल शुगर्स, तर नागपूर विभागातील नागपूरमधील व्यंकटेश्‍वरा व पूर्ती व भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.
लागवड क्षेत्र घटतेय
इतर पिकांच्या तुलनेत उसाला पाणी अधिक लागते. पाण्याची अनुपलब्धता व सिंचनाच्या असुविधेसोबतच सहकार क्षेत्रातील नेत्यांचे मतलबी धोरण साखर उद्योगाच्या पिछाडीस कारणीभूत ठरले आहे. दरवर्षी पेरणीक्षेत्र कमी होत असून आगामी वर्षात हे उद्योग बंद पडण्याची शक्‍यता आहे. यवतमाळ वगळता अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील उस मराठवाड्यात जातो. नागपूर विभागात केवळ नागपूर जिल्ह्यातच 2270 हेक्‍टर क्षेत्रात लागवड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com