८५ लाखांच्या नोटांची विक्री १७ लाखांत  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

अमरावती - ८४ लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटांची डील अमरावतीत केवळ २० टक्‍क्‍यांमध्ये म्हणजेच १७ लाख रुपयांत होणार होती, अशी माहिती प्राथमिक  तपासात पुढे आली. नागपूरच्या ज्या कापूस व्यापाऱ्याच्या मालकीच्या या नोटा आहेत त्याची व्यावसायिक उलाढाल ६० कोटींच्या घरात आहे. 

अमरावती - ८४ लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या जुन्या नोटांची डील अमरावतीत केवळ २० टक्‍क्‍यांमध्ये म्हणजेच १७ लाख रुपयांत होणार होती, अशी माहिती प्राथमिक  तपासात पुढे आली. नागपूरच्या ज्या कापूस व्यापाऱ्याच्या मालकीच्या या नोटा आहेत त्याची व्यावसायिक उलाढाल ६० कोटींच्या घरात आहे. 

अमित रामभाऊ वाकडे हा व्यापारी जुन्या नोटांचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकडेसह त्याचा नागपूर येथील साथीदार पुरुषोत्तम भय्यालाल मिश्रा, संदीप आनंद गायधने (रा. बिच्छुटेकडी, अमरावती), ग्यासोद्दीन उल्लाउद्दीन पठाण (रा. इंदला) अशा चौघांना अटक झाली. तर राहुल कविटकर (रा. गोपालनगर, अमरावती) हा १ हजार रुपये व ५०० रुपयांच्या जुन्या  नोटा विकत घेणार होता. राहुल अद्याप पसार असल्याचे पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी सांगितले. 

एमएच ३१ डीके ५६५६ या लाल रंगाच्या कारमध्ये जुन्या नोटा ठेवून अमरावतीत विकण्यासाठी आणल्या होत्या. नोटाबंदीनंतर एवढी मोठी रक्कम वाकडे याने स्वत:जवळ आतापर्यंत का सांभाळून ठेवली, अशी रक्कम त्याने आणखी किती जणांना ८० टक्के कमी दरात विकली, यासंदर्भातील माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. त्याच्याजवळ ही रक्कम आली कशी, त्याने त्याचा आयकर भरला किंवा नाही. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला एक पत्र देऊन चौकशी करण्यास सुचविले आहे. संदीप गायधने आणि ग्यासोद्दीन हे या प्रकरणात मध्यस्थी करणारे आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  अमरावती शहरातील काही बॅंकांचे अधिकारी बनावट नोटा बाळगणाऱ्यांच्या संपर्कात होते काय आदी संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी आज, बुधवारी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. 

१५ वर्षे वाकडे होते प्राध्यापक
शिक्षकी पेशा सोडून कापूस व्यवसायात येण्यापूर्वी नागपूर येथील अमित वाकडे हे चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होते. त्यानंतर व्यवसायातही त्यांचा जम बसला, असे पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी सांगितले.

त्या नोटांची किंमत शून्य
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या ज्या जुन्या नोटा अमरावती पोलिसांनी जप्त केल्या त्या नोटांची किंमत ८ नोव्हेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ नंतर रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाप्रमाणे शून्य झालेली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

नागपूर आयकर विभागाकडून चौकशी
एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्यानंतर त्याची माहिती आयकर विभागाला दिली. नागपूर येथील सहआयुक्तांच्या नेतृत्वातील पथक चौकशीसाठी अमरावतीत  येणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: amravati news crime