अमरावती : पाऊस झाला बेपत्ता

खरीपास होणार विलंब, पंधरवाडा गेला कोरडा
Amravati Delay in kharif sowing
Amravati Delay in kharif sowingsakal

अमरावती : मोसमी पावसाच्या हंगामात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतानाच हंगामाच्या पंधरवड्यातील स्थिती पावसाबाबत चिंता व्यक्त करणारी ठरली आहे. या कालावधीत आकाशात काळेकुट्ट ढग जमत असले तरी पावसाने मात्र हुल दिल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यंदाचा खरीप हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. 15 जुलैपर्यंत पेरण्या करता येतील असे कृषी विभागाने म्हटले आहे.

मार्च ते मे या पूर्वमोसमी हंगामात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाचे यंदा प्रमाण कमी आहे. पूर्वमोसमीच्या कालावधीत जिल्ह्यांमध्ये एकही टक्का पाऊस झाला नाही. राज्यामध्ये दक्षिण कोकणातून मोसमी पावसाचा प्रवेश 10 जूनच्या दरम्यान झाला. 11 जूनला तो मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचला. 13 जूनला मध्य महाराष्ट्र आणि कोकण ओलांडून त्याने मराठवाड्यात प्रवेश करीत निम्मा महाराष्ट्र व्यापला. मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी या सर्व भागांत एक-दोन दिवस पाऊस झाला. मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर हलक्या सरी कोसळल्या, पण अद्याप एकाही ठिकाणी मोठा पाऊस झाला नाही. त्याचप्रमाणे मोसमी पाऊस दाखल होत असलेल्या भागातही पावसाचे प्रमाण कमी आहे.

गेल्या तीन वर्षात 9 ते 16 जून दरम्यान मोसमी पावसाने आगमन केले आहे. यावर्षी ती तारीख उलटून गेल्यानंतरही दमदार पावसाने आगमन केलेले नाही. जमिनीतील कोरड कायम असून 75 मिमि पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पुर्वमोसमी व मोसमी मिळून 27 मि.मि. पावसाची नोंद आहे. गतवर्षी 157 मि.मि पाऊस झाला होता. जून महिन्यात सरासरी 82.6 मि.मि.सरासरी पाऊस असतो. त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 33 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्यांना अजून सुरवात करता आलेली नाही. कृषी विभागाने पुरेसा पाऊस होईस्तोवर पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे.

धरणांमध्ये 39 टक्के जलसाठा

जिल्ह्यात एक मोठ्या व सहा मध्यम सिंचन प्रकल्पांसह 42 लघू प्रकल्पात सद्यःस्थितीत 39 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात शहानूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मि.मि., चंद्रभागा 11 व पूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 मि.मि पाऊस झाला आहे.

हवामान खात्याचा अंदाज

19 जूनपासून काही भागांत हळूहळू पाऊस जोर धरणार आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती, तर गुजरातपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत चक्रिय वारे निर्माण होणार असल्याने समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढून पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे. पुढील पाच दिवस विदर्भ आणि मराठवाडयातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com