Video : कॉंग्रेसच्या ताब्यात दोन तर भाजपकडे एक पंचायत समिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

सोमवारी लागलेल्या निकालात कॉंग्रेसने तीन पैकी दोन पंचायत समितीवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले. पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, हे विशेष.

अमरावती : पंचायत समितीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीनंतर आठ डिसेंबरला शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांना मतदार राजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्‍वासनाची बरसात करावी लागली होती. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली होती. मात्र, सोमवारी लागलेल्या निकालात कॉंग्रेसने तीन पैकी दोन पंचायत समितीवर विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले. 

काय - दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह

तिवसा पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहाही जागा कॉंग्रेसने जिंकत विरोधकांचा धुव्वा उडविला. पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, हे विशेष. तिवसा पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने सर्वच म्हणजे सहाही जागा जिंकल्या. धामणगाव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, आठपैकी सहा जागांवर विजय प्राप्त केला. भारतीय जनता पक्षाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. तसेच चांदूर रेल्वे पंचायत समितीवर पुन्हा भाजपने झेंडा फडकावत वर्चस्व कायम ठेवल. दोन जागी कॉंग्रेसला विजय मिळविता आला. 

 


तिवसा पंचायत समितीत जल्लोष करताना काँग्रेसचे कार्यकर्ते  

तिवसा पंचायत समिती

तिवसा पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वच म्हणजे सहाही जागा जिंकल्या. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांचे दमदार, विकासाभिमुख नेतृत्व पुन्हा एकदा या निमित्याने अधिरेखीत झाले आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये तब्बल तिसऱ्यांदा विजयाचा इतिहास घडवणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढल्या गेल्याने याचे निकाल काय लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यातील सत्ता गेल्याने आधीच कोमात गेलेले भाजप नेते; मात्र काही चमत्कार घडेल या भ्रमात होते. तिवसा पंचायत समितीच्या वरखेड, मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा, तळेगाव ठाकूर, मार्डी या सहा सर्कलचा समावेश आहे. यामध्ये कॉंग्रेसने सर्वच ठिकाणी नेत्रदीपक विजय मिळविला. यामध्ये तळेगाव ठाकूरमध्ये कल्पना किशोर दिवे, वरखेडमध्ये रोशनी मुकुंद पुनसे, वऱ्हामध्ये नीलेश वासुदेवराव खुळे, मोझरीमध्ये शरद वासुदेवराव मोहोड, मार्डीमध्ये शिल्पा रवींद्र हांडे, कुऱ्हात मुल्ला इसाक हे विजयी झाले. अपेक्षेप्रमाणे भाजपचा मात्र पुरता सुपडा साफ झाला. 

धामणगाव पंचायत समिती

धामणगाव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, आठपैकी सहा जागांवर विजय प्राप्त केला. भारतीय जनता पक्षाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर, वरूड बगाजी, चिंचोली, देवगाव, शेंदुरजना खुर्द या सहा जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर तळेगाव दशासर व अंजनसिंगी जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता प्रस्थापित केली. धामणगाव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. 9) येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शांततापूर्ण वातावरणात पार पडली. 

 

हेही वाचा - जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम

 

चांदूर रेल्वे पंचायत समिती

चांदूर रेल्वे पंचायत समितीवर पुन्हा भाजपने झेंडा फडकावत समितीवर वर्चस्व कायम ठेवल. दोन जागी कॉंग्रेसला विजय मिळविता आला. चंदूर रेल्वे पंचायत समितीच्या सहा सर्कलमध्ये भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी या पक्षासह अपक्ष उमेदवार मिळून एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. चांदूर रेल्वे पंचायत समितीमध्ये सहा सर्कल पैकी पळसखेड, राजुरा, आमाला वि. सातेफळ, घुईखेड या जागी भाजपने विजय मिळविला असून, सर्व जागी महिला निवडून आल्या आहेत. मालखेड व राजुरा सर्कलमध्ये कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati panchayat samiti election result