अमरावती : दर्यापूर वगळता 2009 चा फार्म्युला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

अमरावती : भाजप-सेना युती झाल्याने अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी दर्यापूर वगळता 2009 सालचाच फॉर्म्युला अमलात आणण्यात आला आहे. पाच जागा भाजप लढविणार असून शिवसेनेला तीन जागा देण्यात आल्या. 2009 मध्ये मात्र दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा लढविल्या होत्या.

अमरावती : भाजप-सेना युती झाल्याने अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी दर्यापूर वगळता 2009 सालचाच फॉर्म्युला अमलात आणण्यात आला आहे. पाच जागा भाजप लढविणार असून शिवसेनेला तीन जागा देण्यात आल्या. 2009 मध्ये मात्र दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा लढविल्या होत्या.
अमरावती मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख, मोर्शीतून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व दर्यापूर येथून आमदार रमेश बुंदिले यांची उमेदवारी जाहीर केली. धामणगावरेल्वे तसेच मेळघाट या दोन मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेने माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिवस्यातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, तर अचलपूर येथून नगराध्यक्ष सुनीता फिसके रिंगणात राहणार आहेत. 2009 मध्ये दर्यापूर हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला होता व कॅप्टन अभिजित अडसूळ तेथून निवडून आले होते. यंदा मात्र तो भाजपकडे कायम ठेवण्यात आला आहे. कॉंग्रेसने तिवसा येथून ऍड. यशोमती ठाकूर व धामणगावरेल्वे मतदारसंघातून प्रा. वीरेंद्र जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र अद्यापही एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. दर्यापूर हा मतदारसंघ आघाडीत रिपाइंकडे गेल्याने त्या ठिकाणी रिपाइंचे बळवंत वानखडे रिंगणात राहतील हे स्पष्ट आहे. मात्र, आघाडीतून बडनेरा, अमरावती, अचलपूर, मेळघाट व मोर्शी मतदारसंघातून कोणते उमेदवार रिंगणात उतरतात याची उत्सुकता शिगेला आहे. आघाडीने मोर्शी हा मतदारसंघ स्वाभिमानी पक्षासाठी सोडला आहे.

धामणगावरेल्वे, मेळघाट "टफ'
धामणगावरेल्वे तसेच मेळघाट मतदारसंघातून युतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. या दोन्ही ठिकाणी असलेले दावेदार चांगले बलाढ्य असल्याने वरिष्ठ स्तरावरून सावध भूमिका घेत निर्णय होण्याचे संकेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati seat distribution formula