संमती महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अमरावती : अभियांत्रिकीच्या पेपरफूटप्रकरणी वाशीम येथील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संबंधित विभागाने ही कारवाई केली आहे.

अमरावती : अभियांत्रिकीच्या पेपरफूटप्रकरणी वाशीम येथील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संबंधित विभागाने ही कारवाई केली आहे.
विद्यापीठाच्या मूल्यांकन विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी या कारवाईला दुजोरा दिला. तर महाविद्यालय प्रशासनाने अद्याप तसे कोणतेही अधिकृत पत्र यासंदर्भात प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी 8 जून 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यात आतापर्यंत आशीष श्रीराम राऊत (वय 28, रा. बोर्डी, ता. अकोट) व निखिल अशोक फाटे (वय 27, रा. गाडगेनगर, अमरावती) व ज्ञानेश्वर बोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बोरे हे संमती महाविद्यालयात लिपीक म्हणून कार्यरत होते. हे प्रकरण राज्याच्या विधानसभेतसुद्धा गाजले. फ्रेजरपुरा पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये एकच नव्हे तर पाच विषयांचे पेपर फुटल्याची बाब पुढे आली. प्रत्येक पेपर दीड हजार रुपयांमध्ये विकल्या जात होता, असे पोलिसांनी सांगितले.
संस्थेला वेठीस धरणे अयोग्य
त्या पेपरचा निकाल जाहीर झाला आहे. मग पेपर फुटले हा आरोप ठेवून परीक्षा केंद्र रद्द करणे, हा ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्थेवर अन्याय आहे. आरोप केलेल्या कर्मचाऱ्याला काढून टाकले. एका कर्मचाऱ्याकरिता संस्थेला वेठीस धरणे योग्य नाही, असे संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थाचालक ऍड. वैशाली वालचाळे यांनी सांगितले.

चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संमती महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.
-डॉ. हेमंत देशमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amravati university canceled examination center of sammati college