ठरलं आता, अखेर निघाला मुहूर्त; २० ऑक्टोबरपासून अमरावती विद्यापीठाची परीक्षा

file photo
file photo

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व अनुशेषाच्या परीक्षा येत्या २० ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी बुधवारी (ता. १४) स्पष्ट केले. २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा यापूर्वी जाहीर केलेल्या ४ ऑक्‍टोबरच्या वेळापत्रकानुसार होणार असून १२ ते १९ ऑक्‍टोबरच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक चुका दुरुस्त करण्यात आल्या असून परीक्षा सुरळीत होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे लांबल्या परीक्षा

कोरोना संक्रमणामुळे परीक्षा उशिराने घेण्यात येत आहेत. विलंब झालेल्या परीक्षा एक ऑक्‍टोबरपासून सुरू होणार होत्या, त्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रखडल्या. १२ ऑक्‍टोबरला त्या पुन्हा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले, मात्र तांत्रिक चुकांमुळे उडालेल्या गोंधळात त्या पुन्हा स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्या. आता २० ऑक्‍टोबरपासून परीक्षा सुरळीत घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

कुलगुरुंच्या दालनात झाली बैठक

कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत २० ऑक्‍टोबरपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन व ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये पुन्हा काही तांत्रिक दोष येणार नाहीत, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. वेळापत्रक नव्याने तयार करण्यात येत असून विद्यार्थ्याचे परीक्षा प्रवेशपत्र तपासण्यात आलेले आहेत.

एक लाख विद्यार्थी देणार ऑनलाइन परीक्षा

ऑनलाइन परीक्षेसाठी एक लाख; तर ऑफलाइन परीक्षेसाठी ५ हजार ३०० विद्यार्थी आहेत. ऑनलाइन परीक्षेत पुन्हा तांत्रिक दोष उद्‌भवणार नाही, असे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचणी जाऊ नये, असा प्रयत्न करण्यात येत असून काही अडचण गेल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मुख्य पृष्ठावर संपर्क यादी दिली आहे. विद्यार्थी अडचणींच्या निराकरणासाठी यादीतील कुणालाही संपर्क करू शकतील, असे परीक्षा विभागाने म्हटले आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com