अमरावती विद्यापीठ : "पेड बाय मी' प्रकरणात विभागप्रमुखाला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अमरावती : रसायनशास्त्र विभागात घडलेल्या "पेड बाय मी' प्रकरणाच्या चौकशीसाठी एकसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीचा अहवाल कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे प्राप्त झाल्यावर त्यांनी डॉ. आनंद अस्वार यांना नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.

अमरावती : रसायनशास्त्र विभागात घडलेल्या "पेड बाय मी' प्रकरणाच्या चौकशीसाठी एकसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीचा अहवाल कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे प्राप्त झाल्यावर त्यांनी डॉ. आनंद अस्वार यांना नोटीस देऊन खुलासा मागितला आहे.
विद्यापीठात रसायनशास्त्र विभागातील लॅब वर्क प्रयोगासाठी भरलेली रक्‍कम "पेड बाय मी'चे कारण पुढे करून विभागप्रमुखाकडून उचलण्यात यायची. हा पेड बाय मीचा घोटाळा रसायनशास्त्र विभागात उघड झाला होता. पदव्युत्तर पदवी तसेच संशोधन करणारे विद्यार्थी विविध कंम्पाउंड तसेच विविध प्रयोगांचे विश्‍लेषण करीत असतात. रसायनशास्त्र पदव्युत्तरमध्ये विद्यार्थ्यांचे रिसर्च, प्रोजेक्‍ट सॅम्पलच्या विश्‍लेषणासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसते. विभागातीलच एनएमआर, आयआर, एसईएम आदी विविध प्रकारचे प्रोजेक्‍ट विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सत्रात केले जातात. यासाठी प्रोजेक्‍ट रिसर्च सॅम्पलचे ऍनालिसीस बाहेरील संस्था विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना करून घ्यावे लागते. विद्यापीठातील विभागप्रमुखाने बाहेरील संस्थांकडून नमुना विश्‍लेषण केल्यास विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. बाहेरील संस्थांकडून या नमुना विश्‍लेषणाचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांवर पडू नये म्हणून विद्यापीठात अर्थसंकल्पात ट्रेनिंग लॅबोरटरी वर्क ऑफ पीजी ऍण्ड रिसर्च स्टुडंट्‌स या हेडखाली आर्थिक तरतूददेखील असते. यानंतर कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू होती. नमुना विश्‍लेषणाचे निकाल तातडीने मिळावे म्हणून विद्यार्थी यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करतात. नंतर ई-मेलद्वारे विश्‍लेषणाचा निकाल प्राप्त होत असून विश्‍लेषण केलेल्या संस्थेकडून रकमेची पावती पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून रसायनशास्त्र विभागाला प्राप्त होते. ही पावती विभागप्रमुखाच्या नावाने येत असल्याने सर्वप्रथम त्यांच्याकडे जाते. विद्यार्थ्यांच्या रकमेची पावती आल्यानंतर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार रक्‍कम मिळणे आवश्‍यक आहे. मात्र पावती सत्र संपल्यानंतर किंवा उशिराने येतात. अशा स्थितीत विद्यार्थ्यांकडून भरण्यात आलेली रक्‍कम स्वतः भरल्याचे दर्शवून ही रक्‍कम विभागप्रमुख स्वतःच उचलत होते. विद्यापीठात यालाच पेड बाय मी घोटाळा म्हटले गेले.

"पेड बाय मी' प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला. अहवालाची प्रत डॉ. अस्वार यांना देऊन 20 दिवसांच्या आत खुलासा करण्याची मुदत दिली. खुलासा व अहवाल याची पाहणी करून त्यावर हेरिंग होईल. त्यानंतर पुढील निर्णय देण्यात येणार आहे.
-डॉ. मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati University: Notice to the Head of Department on "Paid By Me" Case