बोंडअळीचे संकट गडद होण्याचा धोका

बोंडअळीचे संकट गडद होण्याचा धोका

अमरावती - बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे संकट आगामी हंगामात गहिरे होण्याचा धोका लक्षात घेता यावर मात करण्यासाठी बियाणे कंपन्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह जिनिंग-प्रेसिंग तसेच बियाणे गोदामामध्ये फेरोमोन्स ट्रॅप लावले जात आहेत. 

राज्यातील कपाशीचे ३२.५८ लाख हेक्‍टर क्षेत्र बोंडअळीने बाधित आहे. बीटी बियाण्यांसोबत दिलेल्या रिफ्यूजी बियाण्यांचा शेतकऱ्यांनी वापरच न केल्याने हे संकट ओढावल्याचे बियाणे कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. २००२ पासून बीटी बियाण्यांचा वापर सुरू आहे. रिफ्यूजी बियाण्यांअभावी गुलाबी व शेंदरी बोंडअळीची प्रतिकार क्षमता वाढीस लागली. तीन वर्षांपासून त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. 

आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कपाशीला गुलाबी व शेंदरी बोंडअळीने कवेत घेतले. पंजाबमध्ये कपाशीनंतर गहू पीक घेतले जाते. यातून बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होतो, त्यामुळे पंजाबमध्ये कपाशीवर गुलाबी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव अद्याप दिसून आलेला नाही, असेही सांगण्यात येते. 

यावर्षी बोंडअळीचे नियंत्रण न केल्यास पुढील वर्षी हे संकट वाढण्याची भीती असल्याने कृषी विभागाने महिको (परभणी, नांदेड), अजित सीड्‌स (बीड, अकोला, धुळे), राशी सीड्‌स (जळगाव, अमरावती, यवतमाळ), कावेरी सीड्‌स (अहमदनगर, बुलडाणा), अंकुर सीड्‌स (नागपूर, वर्धा, चंद्रपूर), न्यूजीविडू (बीड, उस्मानाबाद, नंदुरबार), ग्रीन गोल्ड (औरंगाबाद, जालना), नाथ सीड्‌स (जळगाव),आणि कृषिधन या कंपनीवर हिंगोली, वाशीम जिल्ह्यात जनजागृतीची जबाबदारी सोपविली आहे.

अमरावती जिल्ह्यात ८७ जिनिंग-प्रेसिंग आहेत. पैकी ६८ जिनिंग-प्रेसिंगमध्ये बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन्स ट्रॅप लावले जात आहेत. सोबतच कपाशी बियाण्यांच्या गोदामांमध्ये प्रकाश सापळे लावले जात आहेत. एका जिनिंगमध्ये ५० सापळे लावण्याचे नियोजन आहे. बोंडअळीचे कोष जमिनीत कुजत नाहीत. ते जमिनीतून बाहेर काढण्याशिवाय दुसरा पर्याय  नसल्याने बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी फरदड न घेणे, शेत पाच ते सहा महिने कपाशीविरहित ठेवणे, रोटावेटर न वापरता संपूर्ण झाड मुळासकट उपटून टाकणे, कपाशीचा पालापाचोळा नष्ट करणे, जमिनीची खोल नांगरणी करणे या प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबाबतच्या सूचना घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com