कर्जमाफी हा कायम उपाय नाही - शरद पवार

कर्जमाफी हा कायम उपाय नाही - शरद पवार

अमरावती - 'कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्याचा कायमस्वरूपी मार्ग नाही, त्यासाठी शेतीच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के भाववाढ केल्यास आर्थिक हातभार लागून तो सक्षम होऊ शकेल व हाच शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागणार नाही. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण करावी,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

अमरावतीत पवार यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजिण्यात आला होता, त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार आनंद अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अरुण गुजराथी आदी या वेळी उपस्थित होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या असतील, तर त्यांना आर्थिक सक्षम करावे लागेल. कर्जमाफी दिल्याने अडचणी कायमस्वरूपी सुटत नाहीत. मी कृषिमंत्री असताना कर्जमाफी दिली, तो उपाय नव्हता; मात्र त्या वेळी अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याचा भाव होता. मुख्यमंत्री फडणवीस कर्जमाफी योजना जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मला भेटले व सल्ला मागितला, त्याही वेळी मी त्यांना कर्जमाफी द्या असे सांगतानाच, कायम उपाय करायचा सल्ला दिला. तो उत्पादन खर्चावर पन्नास टक्के भाववाढीचा होता. शेतकऱ्यांना चांगले बियाणे व शेतमालाला भाव दिल्यास त्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. या सरकारला माझा सल्ला आहे, एकरी उत्पादन वाढवायचे असेल, तर या मार्गाने गेले पाहिजे. उत्पादन वाढत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत.'' ते पुढे म्हणाले, की शेतकरी कर्ज डोक्‍यावर ठेवून मरण पत्करण्यास तयार नसतो, त्याला कर्ज परत करायचे असते. या देशात लाखो-कोट्यवधी रुपये बुडवणारे महाठक झालेत. शेतकरी इमानदार असल्याने त्याला कर्जमाफी देणे गैर नाही, असे माझे मत आहे. शेतकऱ्यांना बनावट व नकली कीटकनाशके विकणाऱ्या व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांवर खटले दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे मी वर्तमानपत्रांतून वाचले. मात्र, अशा औषधांची विक्री होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे.

दिलदार विरोधक...
देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा उल्लेख "दिलदार विरोधक' असा केला. ते म्हणाले, 'राज्याच्या व देशहितासाठी पवार पक्षीय राजकारण बाजूला ठेवत मदत करतात. कर्जमाफीचा मुद्दा आला असताना मी व चंद्रकांत पाटील त्यांना दिल्लीला जाऊन भेटलो. त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्या वेळी पवारांनी राजकीय फायद्याचा विचार न करता अडचणीतील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी देण्याचा सल्ला दिला. या कामात आवश्‍यक व हवे तितके सहकार्य करण्याचा शब्दही त्यांनी दिला.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com