अमरावती : ओडिसातील भटकलेला मुलगा अखेर पालकांच्या स्वाधीन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

लहान मुलांवर वडील रागावले की मुले नाराज होऊन घर सोडून देतात. ओडिसा राज्यातील अशाच एका अस्वपयीन मुलाने वडील रागावल्यामुळे आपले घर सोडले. तो रेल्वेगाडीने आपल्या भावाच्या गावी रायपूर येथे आला. परत ओडिसा जाण्यासाठी तो रेल्वेगाडीत चढला; परंतु चुकीच्या रेल्वेगाडीने तो अमरावती जिल्ह्यात पोहोचला. रेल्वेगाडीतच तो रडत असताना एका व्यक्तीने त्याला पाहिले. आणि अखेर चाइल्डलाइनच्या मदतीने त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

अमरावती : ओडिसा येथून वडील रागावल्यामुळे घर सोडून भावाकडे रायपूर येथे गेलेला अल्पवयीन मुलगा पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वेत बसला असता अचानक भटकला. परंतु अमरावती चाइल्ड लाइनने त्यात पुढाकार घेतल्याने त्या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात यश आले.

बडनेरा रेल्वे स्थानक प्लॅट फॉर्म क्रमांक 1 येथे पालकाविना 15 वर्षीय मुलगा भटकत असल्याची माहिती चाइल्डलाइनला मिळाली. अमरावतीच्या पथकाने रेल्वे पोलिस स्टेशन गाठून त्या मुलाची भेट घेतली. समुपदेशन करून त्याला भटकण्याचे कारण विचारले.

तो रुगडीमल, ता. नरला, जि. कल्हानडी राज्य ओडिसा येथील रहिवासी आहे. वडील रागावल्यामुळे, तो ओडिसा येथून रायपूर येथे राहणाऱ्या मोठ्या भावाकडे पोहोचला. तेथून पुन्हा ओडिसा येथे गावाकडे जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसला. परंतु चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्याने रेल्वेस्थानक, बडनेरा येथे रडत असताना एका व्यक्तीला दिसला. त्या व्यक्तीने त्याला रेल्वे पोलिस ठाण्यात आणून सोडले.

बडनेरा रेल्वे पोलिसांच्या माहितीच्या आधारे, चाइल्डलाइन समुपदेशक फाल्गुन पालकर यांनी बालकल्याण समिती अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत कळविले. मुलाची वैद्यकीय तपासणी केली व तात्पुरत्या स्वरूपात मुलाला शासकीय निरीक्षणगृह व बालगृह, रुक्‍मिणीनगर अमरावती येथे दाखल केले.

त्यानंतर चाइल्डलाइन गोंदिया येथे प्रकरणाची नोंद असल्याचे समजले व प्रकरणाची दक्षता घेत चाइल्डलाइन सदस्य यांनी चाइल्डलाइन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क करून प्रकरणाची शहानिशा केली. त्याच्या आईवडिलांना, मुलगा अमरावती येथील बालगृहात सुखरूप आहे, असे सांगितल्यावर ते अमरावतीत पोहोचले. चाइल्डलाइनद्वारा घेतलेल्या पाठपुराव्याविषयी मुलाची व पालकांची ओळख पत्रानुसार खात्री करून मुलाला आईवडिलांच्या सुखरूप स्वाधीन केले.

चार दिवसांत दोन कारवाया
हव्याप्र मंडळाच्या चाइल्ड लाइनने चार दिवसांत बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात भटकत असलेल्या दोन परप्रांतीय मुलांना ताब्यात घेऊन सुखरूप त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवून दिले आहे. त्याबद्दल पालकांनीही त्यांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati: A wandering boy in Odisha is eventually handed over to his parents