अमरावतीत हजारो कामगार जिल्हाकचेरीवर धडकले

Morcha
Morcha

अमरावती ः केंद्र सरकारचे धोरण कामगार व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत विविध कामगार संघटनांनी गुरुवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा कचेरीचा परिसर दणाणून गेला होता. 

केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त कृती समिती व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी देशव्यापी संपाचे आयोजन केले होते. त्याचे पडसाद अमरावतीत देखील उमटले. अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलच्या नेतृत्वात नेहरू मैदानापासून सुरू झालेला मोर्चा रेल्वेस्थानक चौकातून इर्वीन चौकात दाखल झाला. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. तेथून हजारो कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

कामगारविरोधी लेबर कोड तत्काळ मागे घेऊन त्यापूर्वीचे कामगार कायदे पुनर्स्थापित करावे, शेतकरीविरोधी कायदे, संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत देणारे कायदे निर्माण करावे, सुधारित वीज विधेयक-२०२० मागे घेणे, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण बंद करावे, रेल्वे, एलआयसी, बीपीसीएल, कोळसा खाण, आयुध कारखाने वाचविणे, कोविड काळासाठी आयकर न भरणाऱ्या कुटुंबाने ७ हजार ५०० रुपये मासिक निर्वाह भत्ता, पुढील सहा महिन्यांसाठी दरडोई धान्य नि:शुल्क देणे, नवीन पेंशन योजना रद्द करणे, शासकीय व सार्वजनिक उद्योगातील कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने निवृत्त करण्याचे परिपत्रक मागे घेणे, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा गटप्रवर्तक, शालेय पोषण कामगार या योजना व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, कर्मचाऱ्यांना किमान २१ हजार रुपये दरमहा वेतन, देशभरातील महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासह एकूण पंचवीस मागण्या मोर्चेकऱ्यांनी रेटून धरल्या. 

मोर्चात तुकाराम भस्मे, चंदू बानुबाकोडे, सुभाष पांडे, जे.एम. कोठारी, रमेश सोनुले, निळकंठ ढोके, राजेंद्र भांबोरे, प्रफुल्ल देशमुख, नंदू नेतनराव, अशोक सोनारकर, महादेव गारपवार, दिलीप शापामोहन, संजय मंडवधरे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com