मातामृत्यूचे विश्‍लेषण थांबले

Mother-Death
Mother-Death

नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे. 

भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषाप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या मृत्यूंवर विश्‍लेषणात्मक चर्चा होणे आवश्‍यक आहे. या निकषाचे पालन करण्यासाठी डेथ ऑडिट करण्याची परंपरा डॉ. निसवाडे यांनी सुरू केली. सुपरमध्ये आठ नोव्हेंबर २०१८ रोजी एकाच रात्री तीन मृत्यू झाले होते. ही गंभीर बाब असल्याने या मृत्यूंवर चर्चात्मक विश्‍लेषण १९ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. यापूर्वी मेडिकलच्या स्त्री व प्रसूती रोग विभागात माता मृत्यूंच्या नेमक्‍या कारणांचा अभ्यासही या डेथ ऑडिट समितीकडून होत होता. तीन ते चारवेळा या समितीने रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंवर चर्चा केली.

मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये डॉ. निसवाडे निवृत्त झाले आणि या प्रक्रियेस थांबा लागला. दै. ‘सकाळ’ने सोमवारी (ता. ३) ‘दहमहा दहा मातांचा मृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. यानंतर मेडिकलमध्ये डेथ ऑडिट कमिटीचा विषय चर्चेला आल्याची माहिती आहे.

अधिष्ठात्यांनी घ्यावा पुढाकार
विकृतीशास्त्र विभाग, औषध वैद्यकशास्त्र, स्त्री व प्रसूतिरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, शल्यक्रियाशास्त्र, बधिरीकरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक मृत्यू विश्‍लेषण समितीमध्ये चर्चा करतात. तीन वर्षांपूर्वी मेडिकल प्रशासनाने कॉलेज कौन्सिलमध्ये निर्णय घेत ही समिती गठित केली. महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी मृतांच्या केस पेपरवरच चर्चा होत असे. परंतु, मृत्यूचे होणारे विश्‍लेषण आता थांबले आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पुढाकार घ्यावा, असे वरिष्ठ डॉक्‍टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com