विद्यमान सरकार पुन्हा आल्यास अराजकता : डॉ. यशवंत मनोहर

अमरावती ः मशाल पेटवून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करताना ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, नरेशचंद्र ठाकरे, भालचंद्र कानगो.
अमरावती ः मशाल पेटवून अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करताना ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, नरेशचंद्र ठाकरे, भालचंद्र कानगो.

अमरावती : आगामी काळातील निवडणुकीत देशातील नागरिकांनी स्वअस्मितेचे कोंडवाडे तोडले नाहीत; तर विद्यमान सरकार पुन्हा सत्तेवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होऊन पुढील वाटचाल अंधःकारमय होणार आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात शनिवारी (ता. नऊ) आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरेप्रेरित अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनात ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉ. भालचंद्र कानगो, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, प्रा. तानाजी ठोंबरे, तुकाराम भस्मे, नंदू नेतनवार आदी उपस्थित होते. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन बांधकाम कामगार नंदू नेतनराव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. मनोहर म्हणाले, 2019 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. देशातील सर्व घटकांनी जाती, धर्म, पंथ भेद विसरून विद्यमान सरकारला घालविणे आवश्‍यक आहे; अन्यथा या देशातील अराजकता टोकाला जाईल. देशाचे संविधान तसेच लोकशाही धोक्‍यात येणार असून त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी आपल्यातील अस्मितेच्या भिंती स्वतःच पाडणे आवश्‍यक आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे या महापुरुषांची जीवनचरित्रे वाचत बसू नका तर त्यांचे विचार आचरणात आणा. निर्भयपणे जगण्यासाठी देशातील पीडित घटकांनी सत्ता हस्तगत करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष प्रा. नरेशचंद्र ठाकरे, तुकाराम भस्मे आदींनीसुद्धा या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. काशिनाथ तेलंग यांनी केले. संचालन प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी केले. आभार प्रा. विजय रोडगे यांनी मानले.
आज समारोप
दोनदिवसीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (ता. 10) दुपारी तीनला कवी डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉ. भालचंद्र कानगो, तुकाराम भस्मे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी निमंत्रितांचे कविसंमेलन तसेच "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भारतातील भवितव्य' या विषयावर व्याख्यानसुद्धा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com