विदर्भात या शहरात सापडले पुरातन जैन मंदिर 

गणेश राऊत 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

नेर (परसोपंत) हे शहर यवतमाळ ते अमरावती राज्य महामार्गावर यवतमाळवरून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच बाभूळगाव व वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथूनही नेर येथे जाता येते. नेर तालुक्‍यातील मंगलादेवी, माणिकवडा, आजनती आदी गावेही तीर्थस्थळासाठी प्रसिद्ध आहेत.  

नेर (परसोपंत)  : नेर शहराच्या मध्यभागी यादवकालीन सोमेश्‍वर मंदिर आहे. हे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. सुमारे सातशे वर्षे जुने मंदिर यादवकाळातील बांधकामाच्या रचनेशी साधर्म्य ठेवणारे आहे. सध्या ते केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. दिवाळीनंतर राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी या मंदिराला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सदर सोमेश्‍वर मंदिर हे शिवालय नसून जैन मंदिर असल्याचा दावा केला आहे. 


पुरातन चबुतऱ्याची पाहणी करताना पुरातत्तव विभागाची चमू. 

नेर (परसोपंत) शहर केंद्रबिंदू मानल्यास परिसरात अनेक हेमाडपंथी शिवमंदिरे आहेत. ती सर्व आजही सुस्थितीत आहेत. तालुक्‍यात रेणुकापूर, सोनवाढोणा, सिंदखेड, सातेफळ, मांगलादेवी, लंकेनाथ, पिंपरी कलगा, धनज, लोहारा, नांदगाव येथे अजूनही पुरातन मंदिरे आहेत. यावरून शेकडो वर्षांपूर्वीदेखील हा परिसर धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न होता, असे दिसून येते. नेर शहराचे वैभव असलेले सोमेश्‍वर मंदिर हे भूतकाळातील वैभवाचे दर्शन घडविते. अत्यंत सुबक, रेखीव तसेच कलाकुसरीने सुशोभित हे मंदिर आजही बहुवंशीय सुस्थितीत आहे. स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना आहे. मंदिराचा खालचा भाग पूर्णपणे दगडी चिऱ्यांनी बांधलेला आहे; तर शिखराचा भाग विटांनी बांधला आहे. गर्भगृहावरील चौथ्या थरापर्यंत मंदिराच्या लुटीच्या शिखराचा भाग सुबकपणे बांधलेला आहे. त्यासाठी वापरलेल्या विटांचा आकारदेखील वेगळा आहे. उर्वरित चौथ्या थरावरचा भाग अलीकडील विटांचा वापर करून अंदाजे दोनशे वर्षांपूर्वी बांधला असावा, असा अंदाज आहे.

 

या विटांमध्ये केलेले काम मुस्लिम स्थापत्य शास्त्राशी मिळते-जुळते आहे. त्याच विटांनी मंडपावर व मुखमंडपावरही बांधकाम करण्यात आले आहे. अजूनही येथे नियमित पूजाअर्चा केली जाते. पूर्वी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे भाविकांच्या रांगा लागत होत्या. परंतु, मध्यंतरी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराचा ताबा घेतला. त्यामुळे सध्या पूजा-अर्चा कमी झाली आहे. लोकांची वर्दळही फारशी नसते. काही दिवसांपूर्वी राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे व पुरातत्त्व विभाग नागपूर येथे सहायक संचालक असलेल्या त्यांच्या पत्नी जया वाहणे दिवाळी सणानिमित्त स्व:गावी आले असता त्यांनी सोमेश्‍वर मंदिराला भेट दिली. मंदिराच्या बांधकामाचे बारकाईने निरीक्षण केले. या शिवालयाच्या द्वारशाखेच्या ललाटबिंबावर "तीर्थनकार' असे कोरलेले दिसले. त्यामुळे हे सोमेश्‍वर मंदिर "शिवालय' नसून पूर्वीचे जैन धर्मियांचे मंदिर असावे, असा दावा त्यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: खाद्य

 

यासंदर्भात वाहाणे म्हणाले, मंदिराच्या पृष्ठभागावरील ललाटबिंबावर जैन मूर्ती कोरली आहे. स्थापत्य शैली व पिल्लरांच्या शैलीवरून हे यादवकालीन मंदिर आहे, हे सिद्ध होते. इ.स.वि. सन 14 व्या शकतात हे मंदिर बांधले गेले असावे. दौलताबाद येथील रामचंद्र यादव या राजाच्या आधिपत्याखाली हा भाग येत होता. अलीकडे काही वर्षांपूर्वी याठिकाणी मातीची गडी होती. नंतर ती पुरातत्त्व विभागाने काढली. काही वर्षांपूर्वी नागरिक या गढीची माती नेत असताना त्यांना गढीमध्ये मंदिर असल्याचे दिसून आले. यानंतर मंदिरावरील सर्व माती हटवून मंदिर पूर्णपणे मोकळे करण्यात आले, असे जुने जाणकार सांगतात. मंदिराच्या द्वारशिखेवर जैन मूर्ती आहे. त्यामुळे आतही जैन मूर्ती असली पाहिजे. जर हे शिवालय असते; तर द्वारशिखेवर गणपती असायला हवे होते. यावरून पूर्वी हे जैन मंदिर होते, या गोष्टीची पुष्टी होते. मंदिराच्या पृष्ठभागावर केलेले लुटीचे बांधकाम मुस्लिम स्थापत्य शैलीतील आहे. गर्भगृहावर जे शिखर आहे, याला मुस्लिम घुमटासारखा आकार देण्यात आला आहे.

मंदिराच्या गर्भगृहात भगवान शंकररांची पिंड आहे. ही पिंड गर्भगृहाच्या स्थापत्यशास्त्राशी सुसंगत नाही. त्याचप्रमाणे पिंडीसमोरील नंदीची (नंदेश्‍वर) मूर्तीदेखील सुसंगत नाही. यावरून हे शिवालय नसल्याचे सिद्ध होते. बाहेर मैदानात एक शिला पडून आहे. या शिलेवर स्वस्तिकासारखा आकार आहे. ही शिला मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचे आसन असावे. जर हे पिंडीचे असते तर ते चौकोनी असायला हवे होते. हे आसन आयताकार असून या खालील चिन्हे हे "डायमंड' आकाराची आहेत. मंदिराच्या पाठीमागे जैन मंदिर आहे; त्या ठिकाणच्या मूर्तीच्या छातीवर चिन्ह आहेत. यावरून हे जैन मंदिरच असल्याची पुष्टी होते. 

 

जैन मंदिराचे शिवालय कसे झाले? 
तब्बल तीनशे वर्षांपूर्वी मुस्लिमांचे राज्य होते. औरंगजेबाने ज्यावेळी स्वारी केली त्यावेळी अनेक मंदिरे उद्‌वस्त केली. हे मंदिर उद्‌वस्त होऊ नये, म्हणून भाविकांनी काही मंदिरे मातीच्या गढीखाली झाकून ठेवली. त्यापैकी सोमेश्‍वर मंदिर, तसेच सोनवाढोणा येथील शिवमंदिर असावे. सोनवाढोणा येथील मंदिर अजूनही गढीखालीच दबून आहे. त्याचा केवळ दर्शनी भाग तेवढा खुला आहे. येथे मंदिराचे रूपांतर शादल बाबाच्या मजारमध्ये करण्यात आले आहे. तत्कालीन जैन व सध्याचे सोमेश्‍वर मंदिर शत्रूपासून सुरक्षित राहावे म्हणून भाविकांनीच गर्भगृहातील जैन मुनींची मूर्ती इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविली असेल व नंतर मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले असावे. तब्बल 200 वर्षांनंतर कालांतराने इंग्रजांच्या काळात परकीयांची आक्रमणे थांबल्यावर गढीची माती नेत असताना मंदिर दृष्टीस पडले. त्या काळातील लोक भगवान शिवशंकराला जास्त मानत होते. त्यामुळे हे शिवशंकराचे मंदिर आहे, असे समजून आत पिंड ठेवण्यात आली असावी. तसेच सोमेश्‍वर मंदिर असे नाव दिले गेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. पुरातत्त्व विभाग जुन्या वास्तू, मंदिरे आपल्या ताब्यात घेताना त्यांच्या प्रचलित नावानेच नामकरण करीत असते. त्यामुळे पुरातत्त्व विभागाकडे या मंदिराची नोंदही सोमेश्‍वर मंदिर या नावानेच आहे. 

सातशे वर्षांपूर्वीचे बांधकाम 
सुुमारे सातशे वर्षांपूर्वी बांधलेले हे जैन मंदिर या भागातील जैन धर्माचा प्रभाव दर्शविते. याचाच अर्थ नेर हे विदर्भातील जैनधर्मियांचे मोठे श्रद्धास्थान होते. परिसरात मोठ्या प्रमाणात जैन धर्माचा प्रचार व प्रसार त्यावेळी झाला होता. हे उपासनेचे मोठे केंद्र होते. मंदिराच्या परिसरात आजही अनेक जैन धर्मियांची घरे आहेत व लगतच मोठे जैन मंदिरही आहे. 
-विलास वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग पुणे. 

 

संरक्षित स्मारकासाठी शिफारस 
यवतमाळ जिल्ह्यातील खासकरून नेर तालुक्‍यातील स्मारके, मंदिरांची पाहणी वेळोवेळी करण्यात येईल. तसेच यातील कलेचा उत्तम नमुना असलेल्या स्मारकांचा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात संदर्भात शिफारस करण्यात येईल. 
-सौ. जया वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, नागपूर. 

 

ललाटबिंबावरून कळते मंदिराची महती 
मंदिराच्या ललाटबिंबावरील मूर्तीवरून मंदिर कुणाचे आहे हे कळते. या सोमेश्‍वर मंदिराच्या ललाटबिंबावर जैन मूर्ती स्थापित असल्यामुळे पूर्वी हे जैन मंदिर होते, असे सिद्ध होते. देशात अशा परिवर्तित झालेल्या अनेक मंदिराची नोंद आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An ancient Jain temple was found in this city in Vidarbha