अन्‌ त्याने मावसभावाच्या घरी केली दागिन्यांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- आरोपीला अटक
- 79 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

वर्धा : मावसभाऊ गावाला गेल्याने घरी असलेल्या मावशीच्या वृद्धापकाळाचा लाभ उचलत आरोपीने सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जॅकी दिलीप परियाल (वय 32, रा. पोद्दार बगीचा) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या चोरट्याने चोरीतील साहित्य परिसरातील वेगवेगळ्या सोनारांना विकल्याने ते जप्त करण्यात अपयश आले आहे. या चोरट्याला पुढील तपासाकरिता शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

वर्धा : पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश छगनलाल परियाल, रा. भामटीपुरा, हे काही कार्यक्रमानिमित्त रायपूर येथे गेले होते. यावेळी त्यांची आई एकटीच घरी होती. याच संधीचा लाभ घेत जॅकी पारियाल याने फायदा घेऊन घरातील कपाट चाबीने उघडून त्यातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. या दागिन्याची किमत 79 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरट्याने चोरीतील साहित्य परिसरातील वेगवेगळ्या सोनारांना विकल्याने ते जप्त करण्यात अपयश आले आहे. या चोरट्याला पुढील तपासाकरिता शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी आकाश परियाल यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आला. स्थानिक गुन्हे शाखेतील पथक वर्धा शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्ह्याबाबत माहिती मिळाल्याने आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.
गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यातील सोने वर्धा शहरातील तीन वेगवेगळ्या सोनार दुकानात विकल्याचे सांगितले. म्हणून त्यास सदर गुन्ह्यात अटक करून पुढील तपासकामी वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश एम. ब्राह्मणे, यांच्या निर्देशाप्रमाणे हवालदार निरंजन वरभे, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And he stole jewelry from his aunt's house