प्राथमिक शाळांशी जोडणार अंगणवाड्या

file photo
file photo

नागपूर : अंगणवाड्या प्राथमिक शाळांसोबत जोडण्यात येणार आहे. यामुळे सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यास मदत होणार असून, बालपणापासून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 200 अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडल्या जातील.
सरकारी शाळांकडील पालकांचा कल कमी होऊन तो इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1,538 वर प्राथमिक शाळा असून, येथील विद्यार्थी पटसंख्या गत पाच वर्षांपासून सरासरी 8 टक्‍क्‍यांहून अधिकने घटली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील पालक आपल्या पालकांना अंगणवाडीत पाठवितात. खासगी इंग्रजी शाळा या अंगणवाड्यांशी संगनमत करून ते विद्यार्थी आपल्याकडे वळते करतात. जिल्हा परिषदेतील शाळांची पटसंख्या वाढावी व खासजी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थी पळविण्याच्या प्रकाराला पायबंद बसावा, यासाठी जागतिक बॅंक व केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने "स्टार प्रोजेक्‍ट' राबविण्यात येत आहे. यासाठी देशातून महाराष्ट्र व हिमाचल प्रदेश या राज्याची निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, महाराष्ट्र राज्यातून यासाठी नागपूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कामठी, हिंगणा, कळमेश्वर व नागपूर या तालुक्‍यातील सुमारे 200 शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत ज्या शाळांच्या परिसरात अंगणवाडी आहे, अशा शाळांची निवड करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांना प्राथमिक शाळेशी जोडून त्यांना सक्षम व समृद्ध करणे हा उद्देश आहे. अंगणवाडीतील बालकांना केवळ आहारापुरते मर्यादित न ठेवता त्यांना शाळेविषयी या प्रकल्पाच्या माध्यमातून आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com