भयंकर घटना! अस्वलीने घेतला तिच्या मुलांच्या खुनाचा बदला

शुक्रवार, 12 जून 2020

मेळघाट व्याघप्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागामध्ये दोन लहान पिल्लांची शिकार केल्यामुळे चवताळलेल्या अस्वलीने दोन शिकाऱ्यांचा जीव घेतला. उर्वरित शिकारी गावात पळून गेल्यामुळेच या घटनेचा उलगडा झाल्याचे सांगण्यात येते.

अमरावती : आपल्या पोटच्या गोळ्यांचा खून झाल्याने संतप्त झालेल्या अस्वलीने दोन शिकाऱ्यांना ठार मारून बदला घेतल्याची हृदयाचा थरकाप उडविणारी घटना व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिकार करण्यासाठी राखीव जंगलामध्ये दहा पेक्षा अधिक लोक गेले होते, असा संशय आहे. वन विभागाने या माहितीच्या आधारावर शोध मोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे.

अस्वलीच्या हल्ल्यात दोघे ठार झाल्यानंतर उर्वरित शिकारी गावात पळून गेल्याची माहिती असून त्यांच्यामुळेच या घटनेचा उलगडा झाल्याचे सांगण्यात येते. मेळघाट व्याघप्रकल्पातील अकोट वन्यजीव विभागामध्ये दोन लहान पिल्लांची शिकार केल्यामुळे चवताळलेल्या अस्वलीने दोन शिकाऱ्यांचा जीव घेतला.

हेही वाचा : असेल तुझी बहीण, आता ही माझी आहे... आमच्यामध्ये पडलास तर ठार मारेल

अशोक मोतीराम गवते (वय 52) व माणा बंडू गवते (वय 42 दोघेही रा. निमखेडी बाजार) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वनविभागाला पुन्हा स्थानिक शिकाऱ्यांचा बोलविता ध्वनी कोण हे शोधण्याची वेळ आली आहे.

अकोट वन्यजीव विभागात सोनाळा, बरवट बकाल वर्तुळात खडकपाणी परिसराच्या राखीव वनक्षेत्रात ही घटना घडली. गुरुवारी (ता.11) सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास वर्तुळ वनरक्षक ए. आर. तोटे व डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना समितीचे निमखेडी येथील अध्यक्ष नक्कलसिंग हे दोघे ज्यावेळी खडकपाणी येथील राखीव जंगलात शिरले तेव्हा अशोक गवते व माणा गवते हे दोघे मृतावस्थेत पडलेले आढळले.

बघा : दुकान उघडू द्या नाही तर मृत्यूची परवानगी द्या

महत्त्वाची बाब म्हणजे मृतदेहापासून पंधरा ते वीस मीटर अंतरावर अस्वलींची दोन छोटी पिल्ले ही मृतावस्थेत पडली होती. त्या पिल्लांच्या शरीरावर कुऱ्हाडीचे वार दिसले. अकोट वन्यजीव विभागाने मृत व्यक्तींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला आहे.

ठार केलेल्या अस्वलीची दोन पिल्लं अंदाजे सात ते आठ महिने वयाची होती. वनविभागाला या घटनेतील मृत दोन ग्रामस्थांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. योग्य कारवाईनंतर शिकारीच्या कटात सहभागी असलेल्यांच्या अटकेची कारवाई होईल.
टी. बेवुला, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्रप्रकल्प.